होमपेज › Konkan › गडकरींचे लेखन दूरदृष्टीचा उत्तम नमुना

गडकरींचे लेखन दूरदृष्टीचा उत्तम नमुना

Published On: May 01 2018 1:16AM | Last Updated: Apr 30 2018 8:16PMदेवरुख : प्रतिनिधी

राम गणेश गडकरी यांना आयुष्य केवळ 34 वर्षांचे लाभले. या कालावधीत त्यांनी चार नाटके लिहिली व ‘राजसंन्यास’ हे अपुरे राहिलेले नाटक आहे. ‘एकच प्याला’ हे गडकरींचे नाटक शतायुषी झाले आहे, ते अमर राहणार असल्याचे स्पष्ट केले. राम गणेश गडकरीच्या ‘एकच प्याला’ या नाटकाच्या शताब्दीनिमित्त प्रा. डॉ. विनायक गंधे यांनी विचार मांडले.

देवरुख येथील श्री सदगुरु लोकमान्य वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त व विश्‍वविख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिन वाचक दिन म्हणून साजरा करताना गंधे यांचे व्याख्यान झाले.विख्यात नाटककार राम गणेश गडकरी  यांनी एकूण साडेचार नाटके लिहिली, असे सांगत गडकरी यांनी ‘एकच प्याला’ हे आता शताब्दी गाठणारे रसिकप्रिय नाटक लिहिले. मात्र, या नाटकाचा प्रयोग पाहण्याचे भाग्य काही गडकर्‍यांना मिळाले नाही, असेही स्पष्ट केले. त्यांच्या मृत्यूनंतर ‘एकच प्याला’ या नाटकाचा पहिला प्रयोग बडोदा राजदरबारी सयाजीराव गायकवाडांनी घडवून आणला. या नाटकात बालगंधर्व, गणपतराव बोडस यांनी भूमिका केल्या. या नाटकाचा जाहीर प्रयोग मार्चमध्ये मुंबईत झाला. गडकरी नाटक लिहिताना नाटकाचा शेवट आधी लिहायचे असे सांगत गंधे यांनी ‘एकच प्याला’ या नाटकाचे हस्तलिखित आजही पुणे येथील विद्यापीठात उपलब्ध आहे, असे सांगितले.

गडकरी  कवी होते, उत्तम नाटककार  होते. मात्र, संगीत नाटकातील गाणी दुसर्‍याकडून लिहून घेतली होती, असा खुलासा गंधे यांनी केला. ‘एकच प्याला’ नाटकातील पदे विठ्ठल गुर्जर यांनी लिहिली होती. 1917 साली ‘एकच प्याला’ लिहून तयार होते. रंगमंचावर ते 1919 साली गडकरींच्या मृत्यूनंतर आले. हे नाटक पुणे येथे घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे असे सांगत या नाटकात मद्यपानामुळे होणारी दुर्दशा दाखवण्यात आली आहे. आजच्या घडीला लागू पडणारे हे नाटक आहे.

या नाटकातील पात्र सिंधू ही फाटक्या वस्त्रातील असूनही बालगंधर्वांनी आपल्या अभिनयाने, गायकीने ‘सिंधू’ अजरामर केली. या नाटकाचे अगदी कर्नाटकातही प्रयोग खूप चालले व फाटक्या साडीतील सिंधुने बालगंधर्वाना कर्जमुक्‍त केले, असेही गंधे यांनी सांगितले. या नाटकातील सुधाकर, तळीराम, मोतीलाल यांचे स्वभाव व विचार विविध दाखले देत गंधे यांनी ‘एकच प्याला’ची महती विषद केली.विल्यम शेक्सपिअर यांच्याबाबत बोलताना या महान नाटकाराची मराठी नाटककारांनी मराठीत भाषांतरे करुन ते भाषासौंदर्य रसिकांसमोर उलगडून दाखवले. 1867 मध्ये महादेव कोल्हटकर यांनी ‘अ‍ॅथोल्लो’ चे भाषांतर केले. शेक्सपिअर यांनी मानवी गूढ, गुंतागुंत रेखाटली तर गडकरी यांनी माणसे रंगवली, असेही प्रा. गंधे यांनी स्पष्ट केले. ‘एकच प्याला’तील सिंधू एवढी अजरामर झाली की, त्या काळी प्रत्येक नागरिकाच्या घरी दोन फोटो दिसायचे ते म्हणजे टिळक व सिंधूच्या भूमिकेतील बालगंधर्व यांचे, असेही विनायक गंधे यांनी स्पष्ट केले.

वाचकांना हे व्याख्यान चांगलेच भावले. यावेळी डॉ. विनायक गंधे यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन करणारे डॉ. सुरेश जोशी हेही उपस्थित होते. राम गणेश गडकरी यांच्या नाटकांवरच गंधे यांनी डॉक्टरेट मिळवली आहे.वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथालय चळवळीत विविध पुरस्कार मिळवणार्‍या गौरवण्यात आले. ग्रंथपाल सौ. श्रद्धा आमडेकर, माजी कार्यवाह शरद बोंद्रे व उत्तम वाचक म्हणून संगमेश्‍वरचे भालचंद्र भिडे यांना गौरवण्यात आले. नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी वाचनालय अध्यक्ष गजानन जोशी, डॉ. सुरेश जोशी, डॉ. गंधे उपस्थित होते. राजेंद्र राजवाडे, प्रा. वर्षा फाटक व प्रा. अरविंद कुलकर्णी यांनी निवेदन केले.

Tags : Konkan, Readers day, devrukh, Ram Ganesh Gadkari