होमपेज › Konkan › चौपदरीकरण कामाच्या दर्जाची चौकशी करावी

चौपदरीकरण कामाच्या दर्जाची चौकशी करावी

Published On: Jun 28 2018 1:33AM | Last Updated: Jun 27 2018 8:59PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यातील वाढते अपघाताचे प्रमाण टाळायचे असेल तर या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण हा केंद्र शासनाकडून प्रकल्प मंजूर असून, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. यासाठी आवश्यक जमीन संपादन करण्यात आली असून, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 

नुकतेच जिल्ह्याच्या दौर्‍यावेळी चौपदरीकरणाच्या कामाची पहाणी केली असता सध्या चौपदीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट होत असल्याचे ना. वायकर यांच्या निदर्शनास आले आहे. केवळ मातीचे थर देऊन त्यावर क्राँक्रिटीकरण केले जात आहे. सध्या ज्या पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याचा पायाच मजबूत नसल्याने मुसळधार पावसात ही माती वाहून जाऊ शकते. माती रस्त्यावर आल्यास मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. या महामार्गावर अगोदरच अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास या मार्गावरील अपघाताच्या प्रमाणात अधिक वाढ होऊ शकते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाची आपल्यास्तरावरुन चौकशी करण्यात यावी, अशी विनंतीही पालकमंत्री वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.