Wed, Mar 27, 2019 06:55होमपेज › Konkan › रत्नागिरीत विनाक्रमांक २ मच्छीमार बोटी पकडल्या

रत्नागिरीत विनाक्रमांक २ मच्छीमार बोटी पकडल्या

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 12 2018 10:03PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरीच्या समुद्रात विना क्रमांक मासेमारी करणार्‍या दोन मच्छीमार बोटींवर मंगळवारी रात्री कारवाई करण्यात आली. या दोन्ही मिनी पर्ससिन बोटी असून, बोटीतील प्रत्येकी 9 हजार रुपयांची मासळी जप्‍त करण्यात आली. सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त आनंद पालव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारी बोटीचा परवाना असणे, त्या बोटीवर क्रमांक असणे, बंदर परवाना असणे अशा अनेक अटींची पूर्तता करावी लागते. परंतु, मंगळवारी पकडलेल्या दोन बोटींवर क्रमांक नव्हता. यातील एका बोटीचे नाव ‘या अली’ असून ती उद्यमनगर येथील तबस्सुम सोलकर यांच्या मालकीची आहे. दुसरी ‘एम इब्राहिमी’ नावाची बोट असून ती मिरकरवाड्यातील नूरमहम्मद जयगडकर यांच्या मालकीची आहे.

क्रमांक नसलेल्या दोन बोटी मासेमारी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त आनंद पालव यांच्या नेतृत्वाखालील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी विजय कांबळे, गुहागर परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर तसेच सुरक्षा रक्षक आणि पर्यवेक्षकांच्या पथकाने मिरकरवाडा जेटीवर मासेमारी उतरवण्यासाठी आलेल्या या बोटीवर कारवाई केली. आता या दोन्ही बोटींविरूद्ध तहसीलदारांच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.