होमपेज › Konkan › दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी विजयी

दिव्यांगांच्या क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी विजयी

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:03PMखेड : प्रतिनिधी

शहरातील गुलमोहर पार्क येथील मैदानात झालेल्या राज्यस्तरीय निमंत्रित संघांच्या ‘दिव्यांग क्रिकेट स्पर्धा’ नगराध्यक्ष चषक 2018 चे विजेतेपद रत्नागिरी संघाने पटकावले. या संघाने रायगडच्या संघाला पराभूत केले.

खेड शहरातील महाडनाका येथील गुलमोहरपार्क मैदानावर दि.3 व 4 रोजी दि महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपूरच्या मान्यतेने दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीतर्फे राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक 2018 दिव्यांग क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत ग्रुप ‘अ’ मध्ये रत्नागिरी,  सोलापूर, सातारा तर ग्रुप ‘ब’ मध्ये कोल्हापूर, नाशिक व रायगड या संघांनी सहभाग घेतला होता. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर पुरस्कृत व पालिकेतील गटनेते अजय माने यांच्या प्रयत्नाने ही स्पर्धा पार पडली.
स्पर्धेत ग्रुप ‘अ’ मधून रत्नागिरी व सोलापूर तर ग्रुप ‘ब’ मधून कोल्हापूर व रायगड या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत यश मिळवून रत्नागिरी व रायगडच्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. स्पर्धेतील अंतिम सामना रत्नागिरी विरूद्ध रायगड असा रंगला. नाणेफेक जिंकून रत्नागिरीच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 110 धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना रायगड संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. परंतु, निर्धारित 111 धावांचे लक्ष दहा षटकांमध्ये पूर्ण करण्यात रायगड संघ अपयशी ठरला.

बक्षीस वितरण समारंभाला माजी जि. प. गटनेते अजय बिरवटकर, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, पालिकेतील गटनेते अजय माने, उद्योजक शिवाजी माने, नगरसेवक तौसिफ खोत, विश्‍वास मुधोळे, कोल्हापूर येथील अतुल नलावडे, सातारा येथील राजेंद्र पवार, नाशीक येथील खंडू कोटकर, सोलापूर येथील मनोज धुत्रे, रायगड येथील शिवाजी पाटील, साईनाथ पवार, कमर मुकादम, सिकंदर मुसा, हेमंत साळोखे, पुष्पेंद्र दिवटे, सौरभ बुटाला, मिलींद नांदगावकर, कन्हैय्या शेठ, महेंद्र पवार, उमेश चाळके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेत ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार रत्नागिरी संघातील आशिष पवार, उत्कृष्ट फलंदाज म्हणून कोल्हापूर संघातील मनोज, गोलंदाज म्हणून रत्नागिरी संघातील एकनाथ पाटील याला सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या रायगड संघाला सिकंदर मुसा यांच्याहस्ते चषक देण्यात आला. तर उपस्थित नगराध्यक्ष वैभव खेडेकर व उद्योजक शिवाजी माने यांच्याहस्ते विजेत्या रत्नागिरी संघाला चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी  रत्नागिरीतील विशेष खेळाडू ओंकार गुरव, मंदार खैर, ओंकार साळवी, प्रशिक्षक रोहित तांबे, अक्षय मोरे, पंच- राकेश मोरे, सुरेश बहापकर, समालोचक-बाळू सनगरे आदींचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. दी महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपूर यांच्यावतीने राष्ट्रीय खेळाडू व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष प्रशांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला.