Tue, Mar 19, 2019 09:43होमपेज › Konkan › शस्त्र परवाना नोंद झाली हायटेक

शस्त्र परवाना नोंद झाली हायटेक

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:16PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

शेतीसाठी आणि स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या शस्त्रांची माहितीचे संकलन अद्ययावत करण्यासाठी शस्त्र परवान्यांची नोंद आता राष्ट्रीय प्रणालीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत परवनाधारक  शस्त्रधार्‍यांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे.  केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत 1 एप्रिल 2016 पर्यंतच्या शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती, खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती राष्ट्रीय प्रणालीमध्ये नोंदविण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे. शेतीसाठी आणि  स्वसंरक्षणासाठी  शस्त्र बाळगण्याची मुभा संरक्षण कायद्यानुसार देण्यात आली आहे. मात्र, या परवान्यांचा कधीकधी गैरवापर होण्याची शक्यता  असते.  कोकणात  शेतीसाठी शस्त्र परवाना घेऊन त्याचा उपयोग शिकारीसाठी सर्रास केला जातो. यातून या आधीही अपवादात्मक अशा गंभीर घटना घडल्या आहेत. या आधी शस्त्र परवान्यांची माहिती विभागापुरती मर्यादित होती. मात्र, आता ती केंद्रीय स्तरावर संकलित करण्यात येणार आहे.

यासाठी जिल्हा प्रशासनांना शस्त्र बाळगणार्‍यांची अद्ययावत माहिती अहवाल देण्याची सूचना करण्यात आली आहे. यानुसार शस्त्र बाळगणार्‍या परवानाधारकांनी याची नोंद राष्ट्रीय शस्त्र परवाना प्रणालीवर करायची आाहे. जे परवानाधारक याची नोंद घेणार नाहीत, त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे शस्त्र परवानाधारक, शस्त्र दुरुस्ती, खरेदी-विक्री परवानाधारकांची माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे.  या प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक (युनिक कोड)देण्यात  येणार आहे. 

या माहितीमध्ये परवानाधारकाची संपूर्ण माहिती, शस्त्राची तसेच शस्त्र उत्पादक व वितरक आदींची माहिती भरणे आवश्यक आहे. ही माहिती भरल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक घेणे बंधनकारक असून असा क्रमांक न घेतल्यास संबंधित शस्त्र परवानाधारकांचा शस्त्र  परवाना रद्द होणार आहे.