Sat, Aug 24, 2019 19:29होमपेज › Konkan › नाणार रिफायनरीविरोधात रत्नागिरीत उद्या लाँग मार्च

नाणार रिफायनरीविरोधात रत्नागिरीत उद्या लाँग मार्च

Published On: Aug 30 2018 1:19AM | Last Updated: Aug 29 2018 9:44PMराजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पविरोधात 31 ऑगस्ट रोजी शिवसेना, रिफायनरीविरोधी शेतकरी  तसेच मच्छीमार संघटना यांच्यामार्फत  रत्नागिरी येथे दि. 31 ऑगस्ट रोजी लाँग मार्च काढला जाणार आहे.

कोकणात नाणार पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पासारखा संहारक व प्रदूषणकारी प्रकल्प केंद्र व राज्य शासनाने कोकणावर लादला  असल्याचा आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. यामुळे आंबा, काजू बागायतदार व मच्छीमार हे मोठ्या संकटात आले असून, या प्रकल्पाला शिवसेना प्रारंभापासून विरोध करीत आहे. या प्रकल्पाविरोधात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे.

31 ऑगस्टला सकाळी 10 वाजता हा लाँग मार्च निघणार आहे. लाँग मार्च डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन रत्नागिरी कुवारबांव येथून तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निघणार असून त्यानंतर शालेय 200 विद्यार्थी मारुती मंदिर येथे यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर लाँग मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन विरोधासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

या लाँग मार्चला शिवसेनेचे पक्ष सचिव व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक  राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, शिवसेना उपनेते व रत्नागिरी विधानसभा आमदार उदय सामंत, आ. सदानंद चव्हाण जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे आदी सहभागी होणार आहेत. रिफायनरी विरोधातील या आंदोलनात विरोधकर्त्या संघटना, संस्था यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व लाँग मार्च यशस्वी करावा, असे आवाहन आ. राजन साळवी यांनी केले आहे.