होमपेज › Konkan › सफाई कामगारांच्या प्रश्‍नात दिरंगाई झाल्यास कारवाई

सफाई कामगारांच्या प्रश्‍नात दिरंगाई झाल्यास कारवाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

सफाई कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यात दिरंगाई होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तशा सूचना सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील नगर प्रशासनसह ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचार्‍यांच्या यंत्रणेचा यात समावेश आहे.

 सफाई कामगारांना लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशी लागू होणे आवश्यक असून सफाई कामगारांच्या विविध प्रश्‍नांच्या अनुषंगाने वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्‍न सोडविण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. मागील बैठकांचा आढावा घेऊन ज्या विभागामार्फत किंवा संबंधित अधिकार्‍यांकडून प्रश्‍न सोडविण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना कार्यवाही का झाली नाही, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे. 

सफाई कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासंदर्भात काही कालबाह्य झालेले शासन निर्णय रद्द करुन नव्याने यावर निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी समिती नेमून त्यावर निर्णय होणे गरजेचे आहे. सफाई कामगारांची वारसा हक्कानुसार नेमणूक व्हावी. नेमणूक केल्यानंतर तीन महिने या कर्मचार्‍यांनी विनापरवानगी अथवा रजा घेतल्यास त्याला काढून टाकण्यात येते. ही तीन महिन्यांची अट रद्द करावी, लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, नगर प्रशासनात कामगार म्हणून नेमणुकीसाठी तयार करण्यात आलेली जुनी प्रतीक्षा यादीच अंमलात आणावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.