Sat, Aug 17, 2019 16:12होमपेज › Konkan › ग्रामस्थानींच जपले दगडातील सौंदर्य

ग्रामस्थानींच जपले दगडातील सौंदर्य

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:44PMरत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील उक्षी येथे आढळलेल्या कातळशिल्पाचे नैसर्गिक व मानवनिर्मित कोणतेही नुकसान होऊ नये तसेच याची प्रसिद्धी सर्वदूर व्हावी, या उद्देशाने येथील ग्रामस्थांनी संरक्षक भिंत बांधून कातळशिल्पाचे संवर्धन केले आहे. या कातळशिल्पाचा लोकार्पण सोहळा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभुते, सरपंच मिलींद खानविलकर, उपसरपंच हरिश्‍चंद्र बंडबे, कातळशिल्प अभ्यासक सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, ॠत्विक आपटे आदी उपस्थित होते. 

काही दिवसांपूर्वीच या कातळशिल्पांचा शोध लागला होता. येथील कातळावर 20 फूट लांब व 16 फूट रुंदीचे हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहे. ही रचना इ.स.पूर्व 10 हजार वर्षांपूर्वीची असावी, असा तज्ज्ञांचा कयास आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत येथे जाण्यासाठी 31 लाख रुपये खर्चून अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्यात आली आहे. या शिल्पापासून काही अंतर लांब कातळावर अनेक आकृती कोरलेल्या दिसून आल्या. मात्र, त्यांचे आकलन अद्याप होऊ शकलेले नाही. या आकृत्याही बांध घालून संरक्षित करण्यात येणार  आहेत. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, अमित शेडगे, अनिल विभुते यांचा सत्कार सरंपच मिलींद खानविलकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कातळशिल्प असणारी जमीन मोफत देणारे जागामालक अनुप सुर्वे, काशिनाथ देसाई आणि ही भिंत बांधण्यासाठी कोणताही मोबदला न घेणारे गावातीलच तरुण कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले.