Wed, May 22, 2019 10:23होमपेज › Konkan › रत्नागिरी जिल्ह्यात रेशनकार्ड-आधार जोडणी 90 टक्के पूर्ण

रत्नागिरी जिल्ह्यात रेशनकार्ड-आधार जोडणी 90 टक्के पूर्ण

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:45PM

बुकमार्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी

रास्त दर धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी पुरवठा विभागाने रेशन कार्डधारकांचे आधार क्रमांक जोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात आधार जोडणीची कार्यवाही 90 टक्के पूर्ण झाली आहे. रेशन दुकानांवर धान्यपुरवठा होत असलेल्या ग्राहकांची आधार जोडणी प्रक्रिया प्राधान्याने करण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. शिधा वितरण व्यवस्थेतील काळाबाजार रोखण्यासाठी ‘पॉस’ यंत्रांचा वापर सुरू झाला आहे. रेशनकार्ड प्रमुखाने अंगठा  दिल्यानंतरच त्याला रेशन दुकानांमधून धान्य मिळणार आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांना त्यासाठी आधारकार्ड संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले. जिल्ह्यात आधारकार्ड जोडणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते.

डिसेंबर 2017 पर्यंतच्या मुदतीत जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभधारक 2 लाख 44 हजार 985 रेशनकार्डधारकांनी आधार जोडणी केल्याचे सांगण्यात आले आहे. अनेकवेळा धान्याची उचल झाल्यानंतर संबंधित दुकानधारकाने किती धान्य वितरित केले, किती शिल्लक आहे, याची माहिती समोर येत नव्हती. धान्य वितरणात रेशन दुकानांवर चालणारा काळाबाजार रोखला जावा,  यासाठी पुरवठा विभागाने  ‘पॉस’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे धान्य काळाबाजार रोखण्यासाठी रेशनकार्डवरील सर्व सदस्यांची आधार जोडणीची मोहीम राबवण्यात आली. यामुळे खर्‍या अर्थाने लाभार्थीला धान्य मिळण्यास मदत होणार आहे.