Thu, Apr 25, 2019 18:18होमपेज › Konkan › नारायण राणे यांना दुसरे आव्हान : आ. साळवी

नारायण राणे यांना दुसरे आव्हान : आ. साळवी

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:08PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शिवसेना कोकण प्रतोद आ. राजन साळवी यांनी स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना दुसरे आव्हान दिले. नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमीन व्यवहारात राणेंनी माझा एक टक्‍का संबंध जरी सिद्ध केला तरी राजकारणातून संन्यास घेईन, असे आ. साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांना हे आव्हान यावेळी तरी पेलवले नाही तर राणेंनी राजकारण सोडावे असे आव्हान दिले. उलट त्यांच्याच संबंधित कोणी जमीन व्यवहार केले आहेत ती नावे सांगितली.

राजापूर तालुक्यातील नाणार रिफायनरीसाठीच्या जमीन व्यवहारात राजापूरचे आ. राजन साळवी यांचा सहभाग असल्याचा आरोप राणे यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना आ. साळवी यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. माडबन अणुऊर्जा प्रकल्पात आ. साळवी यांचे ठेके असल्याचा आरोपही राणे यांनी केला होता. त्यावेळीही त्यांनी हा आरोप सिद्ध करून दाखवल्यास राजकारणातून बाहेर पडेन, असे आव्हान दिले होते. याची आठवण आ. साळवी यांनी यावेळी करून दिली. राणेंना ते शक्य झाले नाही. आता रिफायनरी संदर्भातील आरोप सिद्ध करण्याचे तसेच आव्हान आहे. हेही जमले नाही तर त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे, असे सांगितले.

आ. साळवी या आव्हानावरच थांबले नाहीत तर डॉ. तेली, साटम, गायकवाड नामक व्यक्‍तींनी 800 एकर जमिनीचा व्यवहार केला असल्याचा आरोप केला. सिंधुदुर्गातील भाजप संबंधित असलेल्या काही लोकांनीही 800 एकर जमिनींचा व्यवहार केला असल्याचा आरोप केला. काही झाले तरी हा प्रकल्प रद्द करणारच, असा विश्‍वासही आ. साळवी यांनी यावेळी व्यक्‍त केला. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंसोबत सेनेचे सर्व नेते स्थानिक जनतेसोबतच आहेत, याची आठवणसुद्धा करून दिली.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार रिफायनरीसाठी आग्रही आहे. या प्रकल्पाविरोधात कोकणातील सेनेचे सर्व आमदार, पालकमंत्री, खासदार सर्व स्तरावर पाठपुरावा करत आहेत. आपण स्वत: मुख्यमंत्री, सभागृहात विरोधाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्या ताकदीने अणुऊर्जाला विरोध केला त्याच जोमाने रिफायनरीलाही विरोध करू. अणुऊर्जा प्रकल्पाचे जे काम रेंगाळले आहे तो प्रखर विरोधाचाच परिणाम आहे. तीच अवस्था रिफायनरीचीही होणार असल्याचे आ. राजन साळवी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.