Mon, Jan 27, 2020 12:39होमपेज › Konkan › रत्नागिरी नगराध्यक्ष पंडित यांचा राजीनामा

रत्नागिरी नगराध्यक्ष पंडित यांचा राजीनामा

Published On: May 27 2019 11:55PM | Last Updated: May 27 2019 11:55PM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे सोपवला. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाचा कार्यभार उपनगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे येणार आहे. त्याचबरोबर आगामी तीन महिन्यांत नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पहिल्या टप्प्यातील 87 दिवसांची रजा घेतली. त्यावेळी उपनगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा कार्यभार आला होता. त्यानंतर पुन्हा हजर होऊन राहुल पंडित आणखी 87 दिवसांसाठी रजेवर जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी रजेवर जाण्याऐवजी लोकसभेचा निकाल लागल्यानंतर राजीनामाच देतो, अशी भूमिका घेतली. शिवसेनेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींसह पदाधिकार्‍यांनीही त्यांच्या या भूमिकेला संमत्ती दिली.

लोकसभेचा निकाल गेल्या गुरुवारी लागल्यानंतर नगराध्यक्ष राहुल पंडित सेनेचे विजयी उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत सिंधुदुर्ग दौर्‍यावर गेले होते. त्यामुळे 24 मे रोजी त्यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा देता आला नव्हता. त्यानंतर शनिवार, रविवार सार्वजनिक सुट्ट्या आल्या. सोमवारी त्यांनी अखेर नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अडीच वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीसाठी राहुल पंडित आणि बंड्या साळवी उमेदवारीच्या स्पर्धेत होते. त्यावेळी पंडित यांना उमेदवारी दिली जावी यासाठी साळवी यांनी मान्यता दिली. मात्र अडीच वर्षानंतर त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा या बोलीवर ही उमेदवारी निश्‍चित झाली होती.