Wed, Dec 11, 2019 11:26होमपेज › Konkan › रत्नागिरीची नगराध्यक्ष पोटनिवडणूक नोव्हेंबरमध्ये?

रत्नागिरीची नगराध्यक्ष पोटनिवडणूक नोव्हेंबरमध्ये?

Published On: Jul 23 2019 1:18AM | Last Updated: Jul 22 2019 10:40PM
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

जुलै महिना संपत आला तरी रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूक आचारसंहिता व इतर कार्यवाहीची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे ही पोट निवडणूक आता विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, शिवसेनेच्या विरोधात आघाडी करून लढण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप साळवी हेच उमेदवार असून ही निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच नगराध्यक्षपदाचा कार्यभार राहणार आहे.

थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या शिवसेनेच्या राहुल पंडित यांनी 24 मे रोजी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रत्नागिरी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद रिक्‍त झाल्याचे निवडणूक आयोगाला कळवण्यात आले आहे. पद रिक्‍त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्या पदासाठी निवडणूक घेण्याचा नियम आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी सहा महिने पूर्ण होत असून त्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार आहे. नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक ऑगस्ट महिन्यात लागेल, असा अंदाज बांधून राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान नेत्यांनी शहर विकास आघाडीची मोट बांधून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असते तर जुलै महिन्यात एव्हाना त्याची आचारसंहिता लागण्याची गरज होती. परंतु, अशा कोणत्याही हालचाली नसून विधानसभेची निवडणूक आचारसंहिता सप्टेंबर महिन्यात लागणार आहे. त्यात पोट निवडणुकीची आचारसंहिता वाढली तर त्याचा शहरविकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच ही  पोटनिवडणूक नोव्हेंबर महिन्यातच होणार हे स्पष्ट होत आहे. सध्या नगराध्यक्षपदाचा कार्यभार सत्ताधारी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडे आहे. तेच या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आहेत.

अन् उत्साहावर पाणी फेरले

शहर विकास आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी या पोटनिवडणुकीत तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्‍वभूमीवर तिन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते निवडणूक तयारीच्या उत्साहात असतानाच पोट निवडणूक नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. सत्ताधारी शिवसेनेमध्ये मात्र याबाबत पूर्ण समाधान आहे.