Fri, Apr 26, 2019 19:44होमपेज › Konkan › योग्य कामाची दखल घेतली जातेच : डॉ. सुखटणकर

योग्य कामाची दखल घेतली जातेच : डॉ. सुखटणकर

Published On: Dec 13 2017 1:56AM | Last Updated: Dec 12 2017 10:26PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : शहर वार्ताहर

व्यवस्थेकडून योग्य कामाची दखल योग्यवेळी घेतली जातेच त्यासाठी काही अवधी जाऊ द्यावा लागतो. मला मिळालेल्या सन्माना मध्ये गोगटे-जोगळेकर  महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले.   मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल  महाविद्यालयात आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गोगटे - जोगळेकर  महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठातील एक नामवंत आणि प्रतिष्ठीत महाविद्यालय आहे. सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा, गुणवत्ताधारक शिक्षक आणि विद्यार्थी अशा अनेक घटकांच्या बाबतीत विद्यापीठ वर्तुळात आपल्याकडे आदर्श म्हणून पहिले जाते. मला मिळालेल्या सन्मानात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे भरीव योगदान आहे; याचे फलित म्हणून ही नियुक्ती होय. 

याप्रसंगी प्राध्यापकांच्या वतीने उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे आणि डॉ. शाहू मधाळे यांनी प्राचार्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने प्रबंधक मोहन कांबळे आणि विजयकुमार काकतकर यांनीही त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे उपस्थित होते.