होमपेज › Konkan › मत्स्य विभागाने पकडल्या परप्रांतीय बोटी

मत्स्य विभागाने पकडल्या परप्रांतीय बोटी

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 02 2018 10:30PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी 

सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त विभागाच्या गस्ती पथकाने बेकायदेशीर मासेमारी करणार्‍या बोटींवरची कारवाई गतिमान केली आहे. विनापरवाना मासेमारी करणार्‍या गुजरातच्या दोन बोटी पकडण्यात आल्या आहेत. राज्याच्या समुद्र क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली. परवाना अधिकारी जीवन सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाने ही कारवाई केली. दोन्ही बोटींना अटकावून ठेवण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी 21 फेब्रुवारीच्या बैठकीत सहायक मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकार्‍यांना बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई गतिमान करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

लगेचच दुसर्‍या दिवशी 11 बोटींवर कारवाई झाली. पाठोपाठ मिनी पर्ससीन बोट पकडण्यात आली होती.सहायक मत्स्य व्यवसाय विभागाचे गस्ती पथक रत्नागिरी समुद्र किनार्‍यावर गस्त घालत होते. मिर्‍या बंदर समोर 20 वाव खोल समुद्रात गुजरात-वेरावळ येथील ‘प्रभू संकल्प’ आणि ‘हेमवर्षा’ नावाच्या दोन बोटी मासेमारी करत होत्या. बोटीवरील तांडेलकडे परवान्यासह इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. परंतु कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही.

‘प्रभू संकल्प’ बोट महेश खिमजी अंजनी आणि ‘हेमवर्षा’ बोट भिकाबाई लक्ष्मण चव्हाण यांच्या मालकीची आहे. या दोन्ही बोटींवरील मासळी जप्त करण्यात आली असून बोटी अटकावून ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी तहसीलदारांच्या न्यायालयात प्रतिवेदन केले जाणार आहे. 

मिर्‍या बंदरासमोरच्या समुद्रात पकडलेल्या या दोन्ही मच्छीमार बोटी ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करत होत्या. मासेमारी करण्याबाबतची त्यांच्याकडे कोणत्याही परवानगीची कागदपत्र नसल्याने परवाना अधिकारी जीवन सावंत यांनी त्या बोटी अटकावून ठेवण्याचे आदेश पारित केले.