Wed, Sep 26, 2018 14:12होमपेज › Konkan › खाडीकिनारी ५० गावांत खारफुटी संवर्धन

खाडीकिनारी ५० गावांत खारफुटी संवर्धन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

किनार्‍यांचे नैसर्गिक संरक्षण करणार्‍या खारफुटीचे संवर्धन व्हावे, या माध्यमातून खाडीकिनारी वसलेल्या गावांचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी शासनाने कोकणाीतल खाडीकिनारी असलेल्या 50 गावांमध्ये खारफुटी संवर्धन योजना राबविली  जात आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण व गुहागर या तालुक्यांतील दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना या निवडलेल्या गावांनी राबवितानाच खारफुटी संवर्धनातून आर्थिक विकास साध्य करण्याच्या योजनांचा लाभ या गावांना मिळणार आहे. 

खारफुटीचे संरक्षण होणे व त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची उपजीविका यांचा मेळ घालणे, तसेच खासगी मालकीच्या खारफुटी वनातून उपजीविकेची साधने उपलब्ध करून देणे, या वनक्षेत्राचा दर्जा उंचावणे, यासाठी संयुक्त वन व्यवस्थापनाच्या धर्तीवर ‘कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजना’ राज्य शासनाच्या महसूल व वन खात्याकडून आगामी दोन वर्षांत राबविण्यात येणार आहे. या गावांना खारफुटी संरक्षण व उपजीविका निर्माण योजना राबवण्यात येणार्‍या व्यक्तींच्या समूहांनी वा संस्थांनी योजना राबवण्यास तयार असल्याचा ठराव घेणे आवश्यक राहणार आहे.

ठरावामध्ये खारफुटी संवर्धन कार्यक्रमांतर्गत मिळणारे फायदे घेण्याकरिता कुर्‍हाड  बंदी, चराई बंदी, खारफुटी संरक्षणासाठी वन विभागास मदत, कचरा  टाकण्यास निर्बंध, वणवा नियंत्रण व संरक्षण कामात सहकार्य करणे, गौण वनोपजांचा र्‍हास थांबवणे या बाबींचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. ही योजना राबवण्यासाठी खारफुटी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील कुर्ली, फणसोप, कर्ला, टाकळे, भाट्ये,  चिपळूण तालुक्यातील  दोणवली, गांग्रई, चिवेलीतर गुहागर तालुक्यातील पेवे,  तवसाळ या खाडीकिनारी भागातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे.