Sat, Apr 20, 2019 07:56होमपेज › Konkan › मुलींच्या जन्मदर वाढीत रत्नागिरी जिल्हा अव्वल

मुलींच्या जन्मदर वाढीत रत्नागिरी जिल्हा अव्वल

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 10:53PMरत्नागिरी : प्रतिनिधी    

मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून राज्य व केंद्र शासनांतर्फे सातत्याने प्रयत्न सुरू असून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. काही राज्यांमध्ये आजही मुलींच्या जन्मावर नाके मुरडली जात आहेत किंवा मुलींच्या पाठीवर मुलगा हवाच हा हट्ट कायम आहे.  सर्वत्र ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा परिणाम कोकणात चांगला दिसून येत आहे. राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर एक हजारपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. 

वंशाला दिवा म्हणून मुलग्याकडे पाहिले जाते, तर मुलगीकडे दुसर्‍याचे धन म्हणून पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्‍ती मानत तिची पूजा केली जात असली तरी आजही  गर्भलिंग निदान चाचणी करून मुलींची गर्भातच हत्या केली जाते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या अनेक घटना उघड झाल्यानंतर महाराष्ट्रात ‘बेटी बचाओ’ अभियानावर अधिक भर देण्यात आला होता. तर गर्भलिंग निदान चाचणीवर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. सोनोग्राफी सेंटरवर करडी नजर आली होती.

राज्यात अनेक रॅकेटही उघडकीस आणण्यात आली. गाड्यांमधूनही असे सेंटर चालविणार्‍यांना पोलिसांनी पकडले आहे. मुलींचा जन्मदर सातत्याने घटत असल्याने ही एक राष्ट्रीय समस्या म्हणून पुढे आली होती. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर हजारी 850 पेक्षा कमी आहे. बुलढाणा, वाशीम, जळगाव, पुणे यासह मराठवाड्यातील सातही जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. या अपवाद  कोकण ठरले आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण हजार पुरुषांमागे 1122 असल्याचे गणनेत निष्पन्न झाले आहे. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या माध्यमातून सर्वच स्तरावर होणार्‍या जनजागृतीचा अनुकूल परिणाम कोकणात झाला आहे. 

स्त्रीभ्रुण हत्येचा एकही प्रकार गेल्या अनेक वर्षांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उघड झालेला नाही. तर सोनोग्राफी मशिनची तपासणी वारंवार आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. मुलींच्या जन्मदरात रत्नागिरी वाढ झाल्याने व येथील शहरी व ग्रामीण भागातील दाम्पत्यांमध्ये होत असलेल्या जागृतीबद्दल आरोग्य विभागातर्फे समाधान व्यक्‍त करण्यात आले.