Sun, May 26, 2019 19:11होमपेज › Konkan › एक डिसेंबरपासून मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम

एक डिसेंबरपासून मुख स्वास्थ्य तपासणी मोहीम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

या वर्षी 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत मुख स्वास्थ तपासणी मोहीम म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान राज्यातील 30 वर्षांवरील सुमारे सव्वा कोटी लोकांच्या मौखिक आरोग्यासाठी तपासणी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेनऊ लाख लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील जिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सकांच्या दालनात  याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. देवकर म्हणाले की, मुख स्वास्थ्य हे सर्व शरीराच्या स्वास्थ्याचे गमक आहे. मुख कर्करोग हा कर्करोगामध्ये सर्वात प्राधान्याने आढळून येतो. हा रोग जर पूर्वावस्थेत ओळखला तर तो कर्करोगामध्ये परावर्तीत होण्यापासून आपण वाचवू शकतो. तंबाखूचे सेवन हे कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ओ. पी. डी. मध्ये नियमित तपासण्यात येणार्‍या रुग्णांमध्ये सरासरी 400 ते 500 रुग्ण हे तंबाखूचे सेवन करत असल्याचचे आढळून आले आहे. समपुदेशनानंतर यापैकी 25 टक्के  रुग्ण हे व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षात चार रुग्णांना मुख कर्करोग झाल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले होते. त्यांपैकी दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास आली असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.

मुख कर्करोगाला आळा घालण्यासाठी जनजागृतीबरोबरच 30 वर्षांवरील व्यक्तींची मुख स्वास्थ तपासणी महत्त्वाची आहे. या अनुषंगाने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर ही तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, इतर खासगी संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय व्यावसायिक यांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. 

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत दुपारी 3 ते 5 या दरम्यान तपासणी शिबिर राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा प्रारंभ 2 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून जनजागृतीबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग, सहकार खात्याशी संलग्न कार्यालय, अन्न व सुरक्षा विभाग, पोलिस विभाग, राज्य परिवहन महामंडळ,आरटीओ, वनविभाग, जिल्हा परिषद शाळा, महसूल विभाग, सेल्स टॅक्स कार्यालय, आयकर विभाग, ग्रामपंचायत, तहसीलदार, तलाठी कार्यालये, महिला व बालकल्याण, नगरपालिका, सार्व. बांधकाम विभाग, कायदा व न्याय विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग इ. कार्यालयातूनही मोहीम राबवण्यात येणार आहे. 30 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी या मोहिमेत सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ.  देवकर यांनी केले आहे.