Tue, Jun 18, 2019 20:27होमपेज › Konkan › तक्रारी वाढल्याने न.प.तील बांधकाम लिपिकाची बदली

तक्रारी वाढल्याने न.प.तील बांधकाम लिपिकाची बदली

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 11:20PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

येथील नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील लिपिक किशोर आंबेकर यांची मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी पाणी विभागात बदली केली. सर्वसामान्य नागरिकांची कामे अडवून ठेवणे, आलेल्या प्रस्तावाच्या पुराव्यांची कागदपत्रे तिसर्‍याच प्रस्तावाला जोडणे, प्रस्ताव गहाळ होणे, सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी, नगरसेवकांच्या कामांकडे कानाडोळा करणे, त्याचवेळी बिल्डर मंडळींच्या कामांना प्राधान्य देणे अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्याने मुख्याधिकार्‍यांनी ही कारवाई  केली.

कारवाई म्हणून पाणी विभागात बदली झालेले किशोर आंबेकर बांधकाम विभागात असताना त्यांच्याकडे इमारत परवाना, व्यवसाय ना हरकत दाखले, सीआरझेड, आरक्षण, भूसंपादन अभिप्राय देण्याची कामे होती. घरबांधणीची परवानगी देताना विविध कारणांनी अडविले जातेय, अशा तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडे येऊ लागल्या. प्रत्येक सभेत हा विषय गाजला. शिवसेना गटनेते प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी सहा महिन्यांपूर्वीच्या सभेत आंबेकर बिल्डरांची कामे कशी वेगाने करतात, सुट्टीच्या दिवशीही त्यांची कामे करून देऊन ‘रनप’च्या स्वच्छतागृहात कसे व्यवहार होतात हे सांगून कारवाईची मागणी केली होती.

मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी समज देऊन योग्य रितीने सेवा देण्याची सूचना केली होती. त्यानंतरही प्रस्तावांमधील कागदपत्र गहाळ होणे, थेट भेट झाल्यानंतर शिपाई फारूखकडून ती शोधून घेणे, या शोध कामाचा मोबदला मिळावा म्हणून प्रयत्न करणे, चुकीचे अभिप्राय देणे आणि सर्वसामान्यांच्या कामांची अडवणूक होतच राहिली. संधी देऊन सुधारणा होत नसल्याचे पाहून मुख्याधिकार्‍यांनी किशोर आंबेकर यांना पाणी विभागातील काम सोपवले. येथे पाणी बिले वाटपाचेही काम करावे लागणार आहे.