Wed, Apr 24, 2019 07:42



होमपेज › Konkan › तर रत्नागिरी शहर कोकणचा केंद्रबिंदू ठरेल

तर रत्नागिरी शहर कोकणचा केंद्रबिंदू ठरेल

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 9:07PM



रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी हे सर्वश्रुत शहर आहे. भूमिगत वीजवाहिनी, नवीन नळपाणी योजना, सीएनजी गॅस पाईपलाईन, मिरकरवाडा बंदर विकास, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, रत्नागिरी विमानतळावरून प्रवासी वाहतूक आदी टप्प्यात असलेली विकासकामे पूर्णत्वास गेल्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील हे शहर विकासाच्या दृष्टीने केंद्रबिंदू ठरणार असल्याचे प्रतिपादन खा. विनायक राऊत यांनी केले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त मराठा मैदानावरील सभागृहात आयोजित केलेल्या ‘विकास विचार मंथन’ कार्यक्रमात ते बोलत होते. रविवारी रात्री पार पडलेल्या कार्यक्रमाला शहरातील सर्वसामान्यांपासून प्रत्येक प्रतिष्ठित स्तरावरील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी शहर विकासाच्या संदर्भात अनेक सूचना केल्या. या सूचनांसह उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना आ. उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी समर्पक उत्तरे दिली.

नगराध्यक्षांनी शहरात झालेल्या व प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली. खा. राऊत यांनी शिवसेनेकडून केल्या जाणार्‍या विकासकामांची माहिती दिली. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील शहरांमधल्या वीजवाहिन्या लवकरच भूमिगत केल्या जाणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व शहरांच्या भूमिगत वीजवाहिनी कामासाठी केंद्र शासनाकडून 52 कोटी मंजूर करून घेतले आहेत. त्यातील 10 कोटी रूपये रत्नागिरी शहरासाठी असल्याचे खासदारांनी सांगितले. रत्नागिरी शहराची रखडलेली 63 कोटी रू.च्या पाणी योजनेचे काम लवकरच सुरू होईल. या कामाच्या खोदाईवेळीच भूमिगत वीजवाहिनी, सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याचे नियोजन अपेक्षित असून, ते वर्षभरात पूर्ण होईल, असे खा. राऊत यांनी यावेळी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्गातील व रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्‍वर ते खेडचे चौपदरीकरण लवकर होईल. उर्वरित कामही वेगाने व्हावे यासाठी आ. सामंत यांच्यासह स्वत: लक्ष ठेवून आहोत. यातील पुलांची कामे थांबली आहेत. त्या ठेकेदारांना नोटीस काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी विमानतळाचे विस्तारीकरण होत आले आहे. मार्च अखेरपर्यंत तटरक्षक दलाची चाचणी पूर्ण होईल. मुंबई, गोवा, पुणे विमान प्रवासी वाहतुकीला केंद्राने तत्वत: मान्यता दिली आहे. त्यानंतर पुढील 2/3 महिन्यात प्रवासी वाहतूक सुरू होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. यासाठी लोकसभा अधिवेशनात प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले. गोवा, कर्नाटक, तामिळनाडूच्या धर्तीवर ‘सीआरझेड’ शिथिलता मिळावी यासाठीही प्रयत्न करतोय. किनार्‍यालगत परंपरागत मच्छीमार गावे आहेत. त्यांना ‘सीआरझेड’मधून 50 मीटर तर किनारपट्टीवरील इतरांना 200 मीटरपर्यंत दिलासा मिळावा, ही मागणी लावून धरण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.