Thu, Jul 18, 2019 04:46होमपेज › Konkan › जिल्ह्यात साडेसोळा हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

जिल्ह्यात साडेसोळा हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 12 2017 11:59PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : शहर वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 16  हजार 592  शेतकर्‍यांना 46  कोटी  17 लाख  31  हजार 670   रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 9 हजार 979 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर  6 हजार 613  शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे, ही माहिती जिल्हा उपनिबंधक श्रीमती बकुळा माळी यांनी दिली. माळी यांनी सांगितले की, 2012-2013 ते 2015-2016 या सलग 4 वर्षांत राज्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीब/रब्बी हंगामात बहुसंख्य गावातील आणेवारी 50 पैशांपेक्षा  कमी होती. जिल्ह्यातील काही भागात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍याचे नुकसान झाले होते. त्यामुळे बरेच शेतकरी पीक कर्जाची परतफेड करु शकले नाही.

परिणामी हे शेतकरी थकबाकीदार राहिल्यामुळे असे शेतकरी बँकेकडून नव्याने पीक कर्ज घेण्यास पात्र होऊ शकले नाही. या पाश्‍वर्र्भूमीवर राज्य शासानाने अशा थकीत शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचे जाहीर केले होते. ‘राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रुपयांपर्यत कर्जमाफी  व दीड लाखांवरील शेतकर्‍यांना 1 वेळ ‘समझोता योजना’ लागू केली. तसेच 2015-16  व 016-2017 वर्षात ज्या शेतकर्‍यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड अशा शेतकर्‍यांना 25  टक्के किंवा 25 हजार रुपयांचे प्रोत्साहन पर लाभ देण्याचे घोषित केले होते. 2009-2010 ते 2015-2016 या कालावधीत कर्जांची पुनर्गठण केलेल्या  शेतकर्‍यांपैकी जे शेतकरी 30 जून 2016पर्यंत थकबाकीदार असतील. त्यांनाही हा लाभ देण्यात आला आहे.

शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम 1 ते 66 नमुन्याप्रमाणे ऑनलाईन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील 11 हजार 815 शेतकर्‍यांना 23 कोटी 68 लाख 95 हजार 670 रुपयांची कर्जमाफी  आजपर्यंत मिळाली आहे. 
ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्या मध्ये  जमा करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 4 हजार 777 कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांना 22 कोटी 48 लाख  36 हजार रुपयांची कर्जमाफी आजपर्यंत मिळाली आहे, असे एकूण सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात 16 हजार 592 एवढया लाभार्थी शेतकर्‍यांना कर्जमाफींतर्गत 46 कोटी 17 लाख 31 हजार 670  एवढी रक्कम पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली  आहे.