Fri, Jul 19, 2019 20:09होमपेज › Konkan › पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून राजन शेट्ये

पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून राजन शेट्ये

Published On: Jan 22 2018 1:24AM | Last Updated: Jan 21 2018 10:51PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

शहराच्या प्रभाग क्र. 3 मधून शिवसेनेच्या राजन शेट्ये यांची उमेदवारी नुकतीच निश्‍चित झाली आहे. इतर इच्छुकांपैकी संजय पुनसकर यांना स्वीकृत नगरसेवकपद देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. दुसरे इच्छुक प्रशांत साळुंखे यांचे स्वीकृत सदस्यपद कायम राहणार आहे. समीर झारी यांना मात्र कोणतेही आश्‍वासन मिळालेले नाही. प्रभाग क्र. 3च्या सर्वसाधारण प्रभागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले राजेश सावंत यांनी नुकताच सेनेच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. ते भाजपच्या मार्गावर असून, या रिक्‍त झालेल्या जागी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.

शिवसेनेने ही पोटनिवडणूक जशी प्रतिष्ठेची केली आहे तशी भाजपनेही प्रतिष्ठेचीच केली आहे. भाजपकडून उद्योजक वसंत पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित झाले आहे.
शिवसेनेचे आ. उदय सामंत यांच्यासोबत नुकतीच इतर पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीत राजन शेट्ये यांच्या उमेदवारीवर शिक्‍कामोर्तब झाले आहे. याच निवडणुकीसाठी इच्छुक असलेले संजय पुनसकर यांना स्वीकृत सदस्यपद देण्यावर एकमत झाले आहे. जुलै महिन्यात त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या समीर झारी यांनाही सेना प्रवेशावेळी नगरसेवकपदाची उमेदवारी देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सध्या तरी या आश्‍वासनाची पूर्तता होण्याची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या समर्थक गटात काहीशी नाराजी आहे. आणखी एक विद्यमान स्वीकृत सदस्य प्रशांत साळुंखे या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांनाही उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या स्वीकृत पदाची मुदत वाढण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य असून, त्यांना प्रत्येकी 20 महिन्यांची संधी देण्यात आली आहे. ही मुदत जुलैमध्ये संपणार आहे. दरम्यान, राजन शेट्ये यांना उमेदवारी देण्याच्या झालेल्या निर्णयाला खा. विनायक राऊत यांची मंजुरी घेतली जाणार आहे.