Tue, Jul 16, 2019 01:34होमपेज › Konkan › भारती शिपयार्डच्या गोडावूनला आग

भारती शिपयार्डच्या गोडावूनला आग

Published On: Dec 13 2017 1:55AM | Last Updated: Dec 13 2017 12:16AM

बुकमार्क करा

रत्नागिरी ः प्रतिनिधी

शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसीतील भारती शिपयार्डच्या गोडावूनला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. त्या आधी अज्ञाताने परिसरातील गवताला आग लावली होती. या आगीतून उडालेली ठिणगी व वार्‍यामुळे जवळच असलेल्या गोडावूनमधील गवताने पेट घेतला. अवघ्या काही क्षणांत गोडावूनमधील सामानाने पेट घेतला. या आगीत गोडावूनमधील सामग्री व फायबर साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 70 ते 80 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मिर्‍याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. या कंपनीचे एमआयडीसी येथे दोन  भूखंड आहेत. यापैकी गद्रे कंपनीच्या शेजारी असलेल्या भूखंडाच्या ठिकाणी मंगळवारी दुपारी दीड वाजता आग लागली. या ठिकाणी कंपनीचे गोडावून आहे. कंपनीला आवश्यक असणारे सामान यामध्ये ठेवण्यात येते. सामानाची देखरेख करण्यासाठी सुरक्षारक्षक आणि अन्य कर्मचारीही तैनात करण्यात आलेले आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या गोडावूनला आग लागली.

 गोडावून परिसरात मोकळी जागा आहे. या जागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने ते जाळण्यासाठी अज्ञाताने दुपारच्या सुमारास आग लावली होती. याचदरम्यान मोठ्या प्रमाणावर वारा सुटल्याने अवघ्या काही  क्षणांतच आग इतर ठिकाणी पसरली. सुरुवातीला गवताला लागलेली आग कंपनीच्या गोडावूनपर्यंत पोहोचली. कंपनीच्या गोडावूनमध्येही मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. या गवतासह गोडावूनमध्ये फायबर बोटी उचलण्यासाठी आवश्यक वायर (विंच) जमा करून ठेवण्यात आले होते. फायबरने तत्काळ पेट घेतल्याने सुमारे चार ते पाच विंच जळून खाक झाले. याशिवाय वायर रोप, इलेक्ट्रॉनिक केबल आदी सामानही या आगीत जळून खाक झाले आहे. गोडावूनला आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी याची खबर कंपनीच्या अधिकार्‍यांना दिली.