Wed, Jul 24, 2019 12:03होमपेज › Konkan › बळीराजा शेतकरी संघातर्फे रत्नागिरीत अन्नत्याग सत्याग्रह

बळीराजा शेतकरी संघातर्फे रत्नागिरीत अन्नत्याग सत्याग्रह

Published On: Mar 19 2018 10:37PM | Last Updated: Mar 19 2018 10:36PMरत्नागिरी : प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी कुटुंबियांनी पहिली सामूहिक आत्महत्या केलेल्या राज्यातील पहिल्या घटनेला 32 वर्षे पूर्ण  झाल्यानंतरही शेतकर्‍यांच्या समस्या कायम असल्याच्या निषेधार्थ सोमवारी रत्नागिरी जिल्हा बळीराजा शेतकरी संघातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन  करण्यात आले. आंदोलनात शेतकर्‍यासह कृषी प्रक्रिया उद्योजकांनीही सहभाग घेतला. 

कोकणासह राज्यात शेतकरी कर्ज काढतो.  मात्र, कर्ज  फेडण्यासाठी आवश्यक पाठबळ शासन देत नाही. कृषी मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाचे हप्ते थकतात. यामुळे आलेल्या नैराश्यातून तो आत्महत्या करतो. 32 वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पत्नी आणि चार मुलांसह पवनार येथे नापिक जमीन आणि कृषी कर्जामुळे सामूहिक आत्महत्या केली. राज्यात कृषी क्षेत्रात सुरू झालेली आत्महत्यांची गंभीर समस्या आजही मंत्रालयात शेतकर्‍याने आत्महत्या करण्यापर्यंत कायम आहे. त्यामुळे केवळ संरक्षक भिंती अथवा जाळ्या  उभारून या समस्या सुटणार नसून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघातर्फे  अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात दीपक राऊत, अशोक  जाधव यांच्यासह शुभांगी भागवत, सरिता शिरगावकर, पर्शुराम पांचाळ, संतोष पवार, जीवन संते, दीनानाथ शिवलकर, अभिजीत भोेसले, अरविंद मांडवकर, दशरथ आवाडे, शैलेश मर्चंडे, महेंद्र जाधव, प्रतीक्षा सावंत, तेजस्विनी चव्हाण, सुवर्णा चरकरी, अतुल कुंभार, संतोष चव्हाण, रशीद साखरकर, अशोक पंडित, विठ्ठल आग्रे यांनी सहभाग घेतला. कोकणातील प्रदूषणकारी प्रकल्पांनामुळे ही फलोत्पादने आणि त्यावरील अर्थकारण धोक्यात आले आहे.  

शासन  शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे. जाचक अटी आणि शेतकरी विरोधी कायदे करून शासनाने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव न दिल्यामुळेच सरकारवर कर्जमाफी करण्याची वेळ ओढवली आहे. आता सरकारने कर्जमाफीबरोबरच स्वामीनाथन आयोगही लागू करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात  आले.
-अशोक जाधव 
 

Tags : Ratnagiri, baliraja shetkari sangha, hunger strike, konkan news