Sat, Jul 20, 2019 14:59होमपेज › Konkan › शेतकर्‍यांना बँक कर्ज देणार, महामंडळ व्याज भरणार

शेतकर्‍यांना बँक कर्ज देणार, महामंडळ व्याज भरणार

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 10:52PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्‍या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून  चार कृषी-अर्थ योजना शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनांमध्ये बँकांकडून कर्ज उपलब्ध होणार असून व्याज महामंडळ भरणार आहे.  या योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थी शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक  कार्यालयाने केले आहे. या योजनांमध्ये आर्थिकद‍ृष्ट्या मागास घटकांतील शेतकर्‍यांना भरघोस अर्थसाहाय्य करणार्‍या वैयक्‍तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजना, शेतकरी कुशल योजना या 4 योजनांचा समावेश आहे.

योजनेत  महामंडळामार्फत शेतकरी आणि तरुणांना स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विविध 34 कृषीविषयक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या महामंडळाचे अधिकारी याबाबत मेळावे घेऊन या योजनांची प्रसिद्धी करणार आहेत. त्यामुळे  योजनांचा फायदा शेतीतील होतकरू तरुणांना  होणार आहे. सामूहिक शेतीत मोठ्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. यासाठी कृषी उद्योग करणार्‍या व्यावसायिकांनी आणि शेतकर्‍यांनी एकत्र येण्याचे आवाहन कृषी अधीक्षक एस. एस. जगताप यांनी केले आहे. 

युवकांना मिळणार रोजगार

महामंडळामार्फत त्याचा आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. सामूहिक शेती करणार्‍या या योजनांचा लाभ घेता येणार आहे. योजनांमुळे शेतीमध्ये भविष्य घडविणार्‍या युवकांना रोजगार मिळण्याबरोबरच ते सक्षम होण्यास मदत होणार आहे.