रत्नागिरी : प्रतिनिधी
गतवर्षी पावसाने किमान सरासरी गाठली असल्याने आणि जलयुक्त शिवार योजना राबविताना आलेल्या तांत्रिक अडचणी, तसेच कागदावरच उद्दिष्ट पूर्तता केलेल्या वनराई बंधार्यांमुळे यंदाच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम राहणार आहे. यावर्षी अनेक तालुक्यांचा संभाव्य आराखडा तयार करताना गावांच्या दुपटीने वाड्यांची संख्या प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पाणीटंचाई आराखड्यात 147 गावांमधील 210 वाड्यांच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. मार्चअखेरपर्यंत या गावांमध्ये 28 टँकरचे नियोजन आराखड्यात करण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या कृती आराखड्यात दीड कोटीचा पाणीटंचाई आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी सव्वाशे कोटीचा समावेश करताना पावणेतीन कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. जिल्हा प्रशासनाने 2019 पर्यंत जिल्हा टँकरमुक्तीच्या उद्देशाने विविध योजना राबविल्या. यात जलयुक्त शिवार योजनेमध्ये या वर्षी 107 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या योजना राबवताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे या वर्षी 50 टक्के योजनाच कार्यान्वित होणार असल्यामुळे समाविष्ट असलेली गावे टंचाईग्रस्तच राहणार आहेत.