Wed, Jan 22, 2020 13:13होमपेज › Konkan › भाजप नगरसेवकांचे सत्ताधारी शिवसेनेला आव्हान; ५४ कोटीतच योजना व्हायला हवी

रत्नागिरीची पाणी योजना पूर्ण करून दाखवू

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 23 2017 9:08PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगर परिषदेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रस्तावित नळपाणी योजनेसाठी अतिरिक्त 9 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शहरवासीयांचे हे पैसे असून ते ठेकेदारांच्या लाभासाठी नाहीत. शासनाने मंजूर केलेल्या 54 कोटी रुपयांमधूनच ही योजना झाली पाहीजे. सत्ताधारी शिवसेनेला हे जमत नसेल तर आम्ही 54 कोटीमध्ये ही योजना पूर्ण करून दाखवतो, असे आव्हान भाजपच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिले. त्यामुळे आतातरी या योजनेसंदर्भात विरोध केल्याचे सांगून भाजपला बदनाम करू नये, असेही नगरसेवकांनी सांगितले.

भाजपचे गटनेते समीर तिवरेकर, नगरसेवक राजेश तोडणकर, सुशांत चवंडे, उमेश कुळकर्णी, नगरसेविका सुप्रिया रसाळ, प्रणाली रायकर, मानसी करमरकर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ही योजना भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मयेकर यांनी पाणी योजनेची निविदा कार्यवाही सुरू केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत सत्ता बदल झाला आणि मंजूर 54 कोटी रुपयांची ही योजना शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहुमताने 63 कोटींवर नेली. अतिरिक्त 9 कोटी रुपये रनपच्या फंडातून खर्च करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

अतिरिक्त 9 कोटी रुपये रत्नागिरीकरांचे आहेत. सत्ताधारी शिवसेना नेत्यांच्या लाभासाठी सत्तेचा दुरूपयोग करणे शहरवासीयांशी प्रतारणा ठरेल. मंजूर 54 कोटी रुपयांच्या खर्चामध्ये ही योजना करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पण उगाचच आम्ही विरोध करत असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करू नये. आम्ही तुम्हाला 54 कोटी रुपयांमध्येच ही योजना पूर्ण करून दाखवू शकतो.  तुमच्यात हिंमत असेल तर आमचे आव्हान स्वीकारा, फेर निविदा काढा आणि निविदाप्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करा, असेही आव्हान दिले आहे.

रनपतील सत्ताधार्‍यांना ठेकेदार असलेल्या नेत्यांचा टेकू आहे. त्यांच्या हितासाठी भाजपला का बदनाम केले जातेय? असा सवालही उपस्थित भाजप नगरसेवकांनी विचारला आहे. ही योजना 54 कोटीत करण्यास सत्ताधारी तयार असतील तर आम्ही न्यायालयीन प्रक्रियाही मागे घेण्यास तयार आहोत, असेही या नगरसेवकांनी सांगितले.