होमपेज › Konkan › नाटकाच्या मध्यांतरास प्रेक्षकांचा ‘तमाशा’

नाटकाच्या मध्यांतरास प्रेक्षकांचा ‘तमाशा’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : योगेश हळदवणेकर

रत्नागिरीच्या दौर्‍यावर असलेल्या ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ नाटकाच्या कलाकारांना रत्नागिरीत नाट्यप्रयोग ‘नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ आली. एसीचे तिकिट आकारून प्रत्यक्ष नाटक सुरू झाल्यावर एसीच बंद पडल्याने प्रेक्षकांनी बिनपैशाचा तमाशा दाखवला. एसीची गार हवा नसल्याने आणि प्रेक्षकांच्या गरमागरमीच्या वातावरणात ‘डोण्ट वरी’च्या कलाकारांना मात्र घामच फुटला.  शनिवारी रात्री स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात प्रयोग असल्याने ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ची टीम रत्नागिरीत आली. निसर्गरम्य कोकण आणि या कोकणातील दर्दी प्रेक्षक यांच्या पुढे नाटक सादर करावयास मिळणार म्हणून कलाकारही खुश होते.

अभिनेता उमेश कामत आणि  अभिनेत्री स्पृहा जोशी या जोडगोळीचे हे नाटक असल्याने रत्नागिरीकरही उत्साही होते. उमेश आणि स्पृहा यांची जोडगोळी अनेक यशस्वी नाटके रंगभूमीवर घेवून आली आणि ती प्रेक्षकांनीही उचलून धरली होती. त्यामुळे डोण्ट वरी बी हॅप्पीचा प्रयोग ही जोडगोळी करणार म्हणून रत्नागिरीकरांंनी गर्दी केली होती. नाटकाची तिकिटविक्री करताना हे नाटक एसीमध्ये बसून पहावयास मिळेल, म्हणून प्रेक्षकांनी तिकिटे काढली. संयोजकांनीही तिकिटदर हा एसीचाच लावला होता. मात्र ऐन नाटक सुरू होण्याच्या आधीच एसीने आयत्यावेळी नगर परिषद आणि आयोजकांचा पचका केला.

आपल्या अधूनमधूनच्या सवयीनुसार हा एसी बंद पडला आणि तो बंद पडल्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना नाटकाच्या दरम्यान झालाच ! मग काय विचारता ! नाटकाचा एक अंक झाल्याबरोबरच प्रेक्षकांनी गलका करण्यास सुरूवात केली.  अगदी एसी बंद असल्याने आयोजक आणि नगर परिषदेच्या नावाने शिमगा घातला.  या नाट्यप्रयोगाला रत्नागिरीचे काही आजी आणि माजी नगरसेवकही उपस्थित होते. त्यांनीही एसी बंद पड लेल्या अवस्थेतच नाटकाचा प्रयोग पाहिला. आता हे नगरसेवक न.प. सभागृहात हे ‘एसी बंद’ नाट्य कसे मांडतात, हे येणारा काळच ठरविणार आहे. मात्र या नगरसेवकांनी प्रेक्षकांचा होणारा तीळपापड पाहूनही बघ्याची भूमिका घेतली. 

दरम्यान, हे नाटक एक अंक झाल्यावर जे बंद पडले ते सुरू करावे की नाही? असा प्रश्‍न कलाकारांनाही पडला. त्यामुळे कलाकार उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांनी येवून प्रेक्षकांना विनंती केली. स्पृहा जोशींनी तर नाटक सुरू करायचे का? असा सवाल विचारला असता, प्रेक्षकांनीही कलाकार आणि नाटक वेठीस का धरावे? याचा विचार करून जोरदार होकार देत नाटक सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर नाटक सुरू झाले...आणि घामाच्या धारा वाहत असताना प्रेक्षक पाहत राहिले...कलाकारही घामाघुम झाले असले तरी त्यांच्यातील उत्साह मात्र कायम होता... शेवटी नाटकाच्या नावाप्रमाणेच ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ चा मूड करीत प्रेक्षक प्रेक्षागृहातून बाहेर पडले....मात्र संयोजक आणि नगर परिषदेच्या नावाने बोटे मोडण्याचे ते विसरले नाहीत.
 


  •