होमपेज › Konkan › रत्नागिरीचं नवं रूप येणार जगासमोर

रत्नागिरीचं नवं रूप येणार जगासमोर

Published On: Jan 24 2018 11:11PM | Last Updated: Jan 24 2018 10:11PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अगदी किनार्‍याला खेटून असलेली मच्छीमारांची छोटी छोटी घरं,  छोट्या होड्यांतून मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांची लाईव्ह मच्छीमारी, कांदळवनातून मुक्‍त संचार करणार्‍या विविध प्रकारच्या हजारो पक्षांचा स्वछंद विहार अशी एक ना अनेक निसर्गाची विविध रूपं आता रत्नागिरीत अनुभवायला मिळणार आहे. रत्नागिरीच्या तरुणांनी पुढे येत सुरू केलेल्या डॉल्फिन बोटिंग क्लबच्या माध्यमातून रत्नागिरीची आजवर कधीही समोर न आलेली दुनिया पर्यटकांना दाखवली जात आहे.

डॉल्फिन बोटिंग क्लबची ही सफर सुरू होते ती कर्ला जेटीवर... सर्वप्रथम आपल्याला दर्शन घडतं ते कर्ला आणि राजिवडा आणि फणसोपच्या किनार्‍यावरील मच्छीमारांच्या अगदी खाडीला खेटून असलेल्या छोट्या छोट्या घरांचं. रत्नागिरीच्या बॅक वॉटरमध्ये आपल्या छोट्या छोट्या होड्यातून मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांची लाईव्ह मच्छीमारी पाहत आपण रत्नागिरी जवळच्या जुवे गावाच्या किनार्‍यावर पोहोचतो.इथे किनार्‍यावरील दत्तमंदिर त्याच्या आजुबाजूच्या नारळपोफळीच्या बागा अनुभवत असतानाच कदाचित कोकण किनारपट्टीतील एकमेव असे शिंपल्यापासून चुना तयार करण्याचा कारखाना आपल्याला अनुभवायला मिळतो. या बॅक वॉटरच्या प्रवासात आपल्याला अनेक छोटी छोटी बेटं लागतात आणि या बेटांवर राहणारे हजारो रंगीबेरंगी पक्षी लक्ष वेधून घेतात.

26 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात रत्नागिरीकरांना याचा आनंद लुटता येणार आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर रत्नागिरीकरांनाही या बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. राज घाडीगावकर, प्रशांत परब यांनी यासाठी पुढाकार घेतला 
आहे.