Tue, Jul 16, 2019 00:09होमपेज › Konkan › फरारीच्या मुसक्या ३० वर्षांनी आवळल्या

फरारीच्या मुसक्या ३० वर्षांनी आवळल्या

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:35PM

बुकमार्क करा

रत्नागिरी ःप्रतिनिधी

गेली तीस वर्षे शहर पोलिसांच्या हातावर तूरी देऊन फरारी  झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई रविवार 17 डिसेंबर रोजी रात्री 9.40 वा. सुमारास राजापूरकर कॉलनी येथे करण्यात आली.  रज्जाक कादर खान(रा.मच्छीमार्केट,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तीस वर्षांपूर्वी म्हणजेच 1987 साली रज्जाक काझीवर पोलिसांना मारहाण करुन त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याच्यावर वॉरंटही निघाले होते. परंतु, रज्जाक कादर खान फरारी होण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासून शहर पोलिस त्याचा तपास करत होते.

रविवारी रज्जाक आपल्या आजारी आईला पहाण्यासाठी रत्नागिरीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला होता. रविवारी सुमारास रज्जाक राजापूरकर कॉलनी येथील आपल्या सासूच्या घरी आला असता पोलिस हेड कॉन्स्टेबल एस.एस.सारंग आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रज्जाक कादर खानच्या मुसक्या आवळल्या. सोमवार 18 डिसेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत  केली.