होमपेज › Konkan › कलाकृतीतून सामाजिक संदेश

कलाकृतीतून सामाजिक संदेश

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 10:03PMरत्नागिरी : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची कल्पनाशक्‍ती अफाट असते. त्याला कृतीची जोड दिल्यास त्यांच्यात लपलेला कलाकार उदयास येतो. हीच बाब हेरून शहरातील ‘जीजीपीएस’मध्ये विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून साकारलेल्या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात एक हजारहून अधिक कलाकृतींची मांडणी करण्यात आली असून यातील बहुतांश कलाकृतींमधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कीर कला अ‍ॅकॅडमीचे प्रमुख प्रदीप शिवगण यांच्या हस्ते आणि ‘माध्यमिक’चे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विजया पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.रत्नागिरी एज्युकेशन संस्थेचे माजी संस्थापक अरुअप्पा जोशी यांच्या स्मरणार्थ तीन दिवस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे एक हजारहून अधिक कलाकृती साकारल्या आहेत. यासाठी प्रत्येक वर्गाला एक थीम देण्यात आली होती. त्या थीमवर आधारित कलाकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. यामध्ये कचरा उचलणारी घंटागाडी, पर्यावरणाचे रक्षण करणारे देखावे, समस्यांवर प्रकाश टाकणारी चित्रे याबरोबरचे टाकावूतून टिकावू वस्तू, स्पंजचा वापर करून तयार केलेल्या बाहुल्या, विविध प्रकारची वाहने, रस्ता, जल, वायू आणि लोहमार्गाची माहिती देणारा देखावा यांचा समावेश आहे. गेल्या एक महिन्यात विद्यार्थ्यांनी या कलाकृती तयार केल्या आहेत.

या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे इयत्ता पाचवीतील विद्यार्थी ओम जैन याने घेतलेले गाडीचे रुप होय. यासाठी त्यांना कला शिक्षक विश्‍वेश टिकेकर, अपर्णा जमादार, मयुरी गाडगीळ, गायत्री साळवी, निहाली पवार यांचे मार्गदर्शन लाभले.