Mon, Jan 27, 2020 10:49होमपेज › Konkan › ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’मध्ये स्वबळावरच : भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने

‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’मध्ये स्वबळावरच : बाळ माने

Published On: Feb 12 2019 1:06AM | Last Updated: Feb 12 2019 1:06AM
आरवली : वार्ताहर

राज्यात लोकसभेसाठी युती झाली तरीही रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपला युती नको असून येथून विद्यमान केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी भाजपचे रत्नागिरी - सिंधुदुर्गातील पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी देवरूख येथे सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माने म्हणाले, 2014 ला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या साथीने तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवला. भाजपने नि:स्वार्थीपणे मदत करूनही गेल्या पाच वर्षांत खासदारांनी भाजपच्या कार्यकर्त्याचे एकही विकासकाम केलेले नाही. उलट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना अफजल खान ठरवण्यापासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा वारंवार अपमान करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. हे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना सहन होण्यासारखे नाही. यामुळेच आम्ही या मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवू इच्छितो, हे वरिष्ठांसमोर मांडणार आहोत. 

माने म्हणाले, केंद्रात मंत्री झाल्यापासून सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेसाठी केलेले प्रामाणिक काम, जयगड-डिंगणी रेल्वे मार्गाची झालेली प्रगती, चिपळूण-कराड आणि रत्नागिरी-कोल्हापूर या दोन नव्या मार्गांसाठी सुरू झालेले काम, वाणिज्य मंत्री झाल्यावर त्यांनी कोकणसाठी केलेली कामे ही त्यांच्या विजयासाठी पुरेशी आहेत. शिवाय गेल्या पाच विजयांचा अनुभव आणि मतदारसंघात प्रभू यांची असलेली प्रतिमा मतदारांना नक्‍कीच आकर्षित करेल. केंद्रात भाजपचा एक खासदार वाढवायचा असेल तर हीच संधी आहे, असे माने म्हणाले. 

जनता शिवसेनेच्या मनमानीला कंटाळली आहे. प्रभू यांच्या रूपाने इथला खासदार बदलला की आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे ‘कमळ’ फुलल्याशिवाय राहणार नाही, असा दावा माने यांनी केला. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती नको आहे, असेही माने यांनी सांगितले.

‘राणे-भाजप’ एकत्र आल्यास परिवर्तन...

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ हा ‘एनडीए’चा घटक पक्ष आहे. त्यांनीही आगामी निवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता प्रभू यांच्या रूपाने भाजपला पाठिंबा द्यावा यासाठी हेच शिष्टमंडळ खा. राणे यांची लवकरच भेट घेणार आहे. ते आमच्या मागणीला सकारात्मक पाठिंबा देतील, असा विश्‍वास माने यांनी व्यक्‍त केला. राणे आणि भाजप एकत्र आल्यास इथे परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.