Wed, Aug 21, 2019 19:05होमपेज › Konkan › महिला स्वावलंबनासाठी ‘सरस’ प्रदर्शन

महिला स्वावलंबनासाठी ‘सरस’ प्रदर्शन

Published On: Dec 24 2017 1:44AM | Last Updated: Dec 24 2017 1:44AM

बुकमार्क करा

गणपतीपुळे : वार्ताहर

ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे व स्वयंरोजगारातून त्यांची आर्थिक उन्‍नती साधणे हा  ‘सरस’ प्रदर्शनामागील उद्देश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बचतगटांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘रत्नागिरी सरस 2017’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन रत्नागिरी जि.प.च्या अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी केले.

गणपतीपुळे येथील गणेश मंदिरासमोरील देवबाग परिसरात रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने दि.23 ते 27 डिसेंबर या कालावधीत जिल्हास्तरीय सरस विक्री व प्रदर्शन 2017 चे आयोजन गणपतीपुळे येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या हस्ते शनिवारी दुपारी 2 वा. करण्यात आले. 

या वेळी त्यांनी सरस प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिला बचतगटांना शुभेच्छा देतानाच पाच दिवसीय कालावधीत बचतगटांच्या उत्पादनांची उत्तम प्रकारे विक्री होऊन मागील वर्षापेक्षा भरीव उलाढाल होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त करतानाच सर्व पुरस्कारप्राप्त बचतगटांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर, सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर. कोडापे, रत्नागिरी पं. स.च्या सभापती मेघना पाष्टे, जि.प. सदस्या साधना साळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, पं.स.चे उपसभापती सुनीन नावले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. अडसूळ, विस्तार अधिकारी दिनेश सीनकर, गणपतीपुळ्याचे सरपंच महेश ठावरे, ग्रा.पं.सदस्य अमित घनवटकर आदी मान्यवर व जि.प.च्या विविध खात्याचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

बचतगटांना स्वावलंबी बनवण्यासाठी आयोजित या प्रदर्शनात एकूण 75 स्टॉलमध्ये 118 बचतगट सहभागी झाले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू, घरगुती मसाले, घरगुती चवीचे कोकणी खाद्यपदार्थ, कोकणी मेवा, सेंद्रिय खते, विविध फळांची सरबते, रस, सिरप माफक दरात उपलब्ध झाले आहेत. तसेच सुगंधी अगरबत्ती, विविध प्रकारच्या पर्स, इमिटेशन ज्वेलरी, शोभिवंत वस्तू, गोदडी, लेडीज गारमेंट, नर्सरी आदी वस्तू व साहित्य उपलब्ध होणार आहे.

प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या ‘सरस’ प्रदर्शनाअंतर्गत देण्यात येणार्‍या  राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने जिल्ह्यातील 28 बचतगटांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.