होमपेज › Konkan › मोबाईल बंद ठेवल्यास संपर्क भत्ता नाही

मोबाईल बंद ठेवल्यास संपर्क भत्ता नाही

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:32PMरत्नागिरी  : प्रतिनिधी

एसटी महामंडळाच्या विविध विभागांतील अधिकारी वर्गाने मोबाईल बंद ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकार्‍याला त्या महिन्याचा संपर्कभत्ता देण्यात येणार नाही. मोबाईल कायमस्वरुपी सुरू ठेवण्याचे आदेश एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी दिले आहेत. महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी शनिवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सर्व अधिकार्‍यांनी मोबाईल फोन कायमस्वरुपी सुरू ठेवण्या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

राज्यभरातील विभाग नियंत्रक, वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक व विभागातील इतर अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करून ठेवतात. परिणामी अपघात, आपत्कालीन परिस्थिती व महत्त्वाच्या कामाच्या वेळी संबंधितांशी संपर्क साधणे, निर्णय घेणे शक्य होत नाही. मोबाईल सुरू ठेवण्याबाबत यापूर्वी मध्यवर्ती कार्यालयाने सूचना दिल्या होत्या.

मात्र, याची दखल घेतली गेली नाही. अनेक अधिकार्‍यांचे मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्व अधिकार्‍यांनी मोबाईल कायमस्वरुपी सुरू ठेवावा. बंद केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकार्‍यांना त्या महिन्याचा संपर्क भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंबंधी वाहतूक महाव्यवस्थापक यांनी अधिकार्‍यांना  ताकीद दिली असून हे परिपत्रक राज्यातील 31 विभाग नियंत्रक, विभागीय लेखाधिकारी यांना पाठविण्यात आले आहे.