Wed, Mar 20, 2019 09:12होमपेज › Konkan › महामंडळ बदलणार कर्मचार्‍यांचा ‘लूक’

महामंडळ बदलणार कर्मचार्‍यांचा ‘लूक’

Published On: Jan 03 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 8:20PM

बुकमार्क करा
रत्नागिरी ः प्रतिनिधी

एस. टी.च्या गाड्यांचे रंग बदलले. मात्र, महामंडळात काम करणारे कर्मचारी यांचा गणवेश खाकी आणि निळा हाच आहे. 70 वर्षांच्या महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच गणवेशाबाबत नवा निर्णय घेण्यात आला आहे. चालक-वाहकांसह अधिकार्‍यांच्या गणवेशाच्या रंगामध्ये बदल करण्यात आल्याने नव्या वर्षांच्या पहिल्याच आठवड्यापासून एस. टी.चे कर्मचारी आता नवा ‘लूक’मध्ये दिसणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. राज्यातील सर्व आगारांमध्ये 6 जानेवारी 2018 रोजी दुपारी तीन वाजता या नव्या गणवेश वाटप सोहळा होणार आहे. प्रातिनिधीक स्वरुपात दहा जणांना प्रथम गणवेश वाटप केला जाणार आहे. त्यानंतर सर्व ठिकाणी गणवेशांचे वाटप केले जाईल. 

राज्य परिवहन मंडळाने काळानुसार आपल्या बदल करण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक गाड्या मागे टाकत ‘शिवशाही’ सारख्या नव्या आरामदायी गाड्या रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. बसस्थानकासह सर्वच पातळीवर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या बदलांसोबत कर्मचार्‍यांच्या गणवेशात बदल करण्यात आला आहे. यासाठी ‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ या केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या अभिमत संस्थेकडे गणवेश डिझाईन तयार करून घेतले आहेत. कर्मचार्‍यांच्या गरजा व उपयोगिता जाणून घेऊन नव्या गणवेशांचे डिझाईन बनवण्यात आले आहे. यासह सर्व कर्मचार्‍यांना बूटही देण्यात येणार आहेत. 

चालक-वाहकांबरोबरच वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक, वाहतूक निरीक्षक व सहायक वाहतूक अधीक्षक या कर्मचार्‍यांना खाकी रंगाचा गणवेश देण्यात आला असून, जस-जसा संवर्ग बदलत जाईल, तस-तसा खाकी रंग फिकट होत जाणार आहे. प्रत्येक संवर्गातील कर्मचार्‍याची  वेगळी ओळख निर्माण होईल.अशाच प्रकारे यांत्रिकी कर्मचार्‍यांना निळ्या रंगाचा गणवेश दिला असून, त्यांच्या बदलत्या संवर्गानुसार गणवेशाचा रंग निळ्यापासून राखाडी रंगापर्यंत बदलत जाणार आहे. विशेष म्हणजे एस. टी. महामंडळातील महिला कर्मचार्‍यांच्या सूचनेनुसार त्यांच्यासाठी सलवार-कुर्ता स्वरूपातील गणवेश निश्‍चित केला असून त्यावर परिधान करण्यासाठी आकर्षक जाकीट दिले जाणार आहे. ज्या महिला साडी परिधान करतात, त्यांच्यासाठी काठपदराची साडी व त्यावर जाकीट दिले आहे.