पुणे :
आंब्याचा हंगाम संपून तीन महिने लोटल्यानंतरही ऐन सप्टेंबरमध्ये पुणेकरांना रत्नागिरीच्या ‘हापूस’ आंब्याची गोडी चाखायला मिळणार आहे. चवीला गोड आणि केशरी गर असलेल्या रत्ना हापूसची मार्केट यार्डातील फळबाजारात हंगामपूर्व आवक सुरू झाली आहे. त्याला शहर व उपनगरातील स्टॉलधारकांकडून मागणी होत असून रविवारी त्याच्या प्रतिडझनास 700 ते 1 हजार रुपये भाव मिळाला.
रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी राजन भाटे यांच्या बागेतून 140 डझन आंबे विक्रीसाठी दाखल झाल्याचे सांगून व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, रत्ना आंबा ही हापूस आंब्याची एक जात आहे. त्याचा आकार हा हापूस आंब्यापेक्षा थोडे मोठा असतो. एका फळाचे वजन हे साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम आहे. रत्ना आंबा वर्षातून दोन वेळा बाजारात दाखल होतो़ यामध्ये मे अखेरीस आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात आंबा मार्केटमध्ये येतो. मात्र, सप्टेंबर महिन्यात दाखल होणारा आंबा हा हंगामपूर्व असतो़ सध्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असलेला आंबा चांगल्या दर्जाचा असून त्यांना किरकोळ बाजारातील फळ विक्रेत्यांकडून चांगली मागणी राहिली. दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवस रत्ना आंब्याची आवक तुरळक सुरू राहील.
हापूस आंब्याना देश तसेच परदेशातून मोठी मागणी असते. रत्नागिरी हापूसचा हंगाम साधारपणे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होतो. जून महिन्यापर्यंत रत्नागिरी हापूसची आवक सुरू असते. दरम्यान, हापूसचीच एक जात असलेल्या रत्ना आंब्याला साधारणपणे वर्षातून दोनदा मोहोर फुटतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रत्ना आंब्याची आवक होते. त्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिन्यांनी पुन्हा मोहोर येऊन हा आंबा तयार होतो. या जातीचा आंबा रत्नागिरी हापूसप्रमाणे रंगाने केशरी आणि चवीला गोड राहतो. त्यामुळे त्यालाही नागरीकांची पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.