Mon, Nov 19, 2018 12:38होमपेज › Konkan › रेल्वे भरतीबाबत ‘स्वाभिमान’ आक्रमक

रेल्वे भरतीबाबत ‘स्वाभिमान’ आक्रमक

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 09 2018 10:52PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वेच्या भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांचा समावेश करा अन्यथा भरती प्रक्रिया बंद पाडू, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्वाभिमान संघटनेने दिला होता. सोमवारी रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक उपेंद्र शेंड्ये यांनी पक्ष पदाधिकार्‍यांची तातडीने बैठक बोलावली. या महत्त्वाच्या मागणीबाबत आपण व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याशी चर्चा करू, असे आश्‍वासन त्यांनी संबंधित कार्यकारिणीला दिले.

मात्र, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहिल, असा इशारा कोकण रेल्वेला ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षाने दिला आहे. पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीसोबत लढा देत आहे. याच संदर्भात निलेश राणे यांनी गेल्याच महिन्यामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा प्रश्‍न मांडला होता. यावर ना. गोयल यांनी कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले असून पुढील कार्यवाहीसंदर्भात चर्चाही सुरू आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वेकडून असिस्टंट लोको पायलटची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्यात आलेले नसल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला असून ही भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान पक्षाने निवेदनाद्वारे कोकण रेल्वेकडे केली आहे.