Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Konkan › रत्‍नागिरी : जयगड-दाभोळ गॅस पाईपलाईनला विरोध

रत्‍नागिरी : जयगड-दाभोळ गॅस पाईपलाईनला विरोध

Published On: Feb 24 2018 9:24PM | Last Updated: Feb 24 2018 9:23PMखंडाळा : वार्ताहर

तालुक्यातील जयगड ते दाभोळ गॅस पाईपलाईनसाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडून पंचनामे सुरू झाले आहेत. शनिवार दि. 24 रोजी वाटद-कोंडवाडी येथे मोजणीसाठी अधिकारी दाखल झाले होते. परंतु, ग्रामस्थांनी या मोजणीला विरोध करत या मोजणी अधिकार्‍यांना रिकामे परत पाठवले. 

जयगड ते दाभोळ ही गॅस पाईपलाईन जयगड, नांदिवडे, चाफेरी, वाटद या गावांतून  जाणार आहे. या पाईपलाईनसाठी येथील ग्रामस्थांचा विरोध नाही परंतु या प्रकल्पात जाणार्‍या जमिनी आणि झाडांचा दर आधी जाहीर करा, मगच या पाईपलाईनची पुढील कार्यवाही करा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. परंतु, ग्रामस्थांच्या मागणीचा कोणताही विचार न करता शासन आणि कंपनीकडून जमिनीची मोजणी करण्यात येत आहेत. त्यामुळे आपल्या हक्‍कांसाठी वाटद कोंडवाडीतील ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी या मोजणीला जोरदार विरोध केला आहे. 

शेतकर्‍यांचा विरोध डावलून जर शासनाला हा प्रकल्प करायचा असेल तर येथील शेतकरी ‘धर्मा पाटील’ बनायलाही तयार आहेत. आम्हाला देशोधडीला लावूनच शासनाने हा प्रकल्प करावा आणि आमच्या वारसांना मिळणार्‍या मोबदल्याची रक्‍कमही शासनानेच घ्यावी, असे येथील शेतकर्‍यांनी यावेळी अधिकार्‍यांना धारेवर धरत म्हटले आहे. 

या प्रकल्पाला अगोदर विरोध करणारे काही नेते आता कंपनीच्या अधिकार्‍यांबरोबर मोजणीसाठी फिरताना दिसत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील आजी-
माजी लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांची बाजू मांडावी, असे बोलले जात आहे. प्रांताधिकारी यांनी वाटद-कोंडवाडी येथे येऊन शेतकर्‍यांजवळ बोलावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

या मोजणीला विरोध करण्यासाठी सुनील वनये, गोपाळ वनये, राजेंद्र बंडबे, प्रकाश बंडबे, रमेश कांबळे, सुनील कांबळे, बाळ जोग, राजेंद्र बाचरे, शेखर भडसावळे, सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.