Sat, Sep 22, 2018 06:46होमपेज › Konkan › महापुरुषांच्या सन्मानार्थ ‘रनप’चा पुढाकार

महापुरुषांच्या सन्मानार्थ ‘रनप’चा पुढाकार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

स्वातंत्र्य लढ्यातील महापुरूष लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तेवत ठेवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. स्वा. सावरकरांनी ज्या गाडीतळ येथील व्यायाम मंदिरात व्यायाम केला त्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या मुहूर्तावर खा. विनायक राऊत यांच्याहस्ते आणि आ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत या व्यायाम मंदिराचा शनिवारी लोकार्पण सोहळा होणार असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्वा. सावरकरांसह रत्नागिरीतील मान्यवर मंडळी या व्यायामशाळेत जात होती. यामध्ये माजी नगराध्यक्ष स्व. ज. शं. केळकर, स्व. सदुभाऊ पाटणकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. जी-जी मान्यवर मंडळी हयात आहेत त्यांचा आणि जे स्वर्गवासी झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सत्कार केला जाणार आहे. त्याचबरोबर या व्यायामशाळेत शिकून अनेकांनी स्वत:च्या व्यायामशाळा सुरू केल्या आहेत अशांचाही यानिमित्ताने सत्कार केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष पंडित यांनी यावेळी सांगितले.

रत्नागिरी शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या 16 व्यायामशाळा असून नूतनीकरण झालेली हे स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायाम मंदिर अद्ययावत व्यायामशाळा बनवण्यात आली आहे. येथे मोफत व्यायाम करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तळमाळ्यावर पुरूषांसाठी व्यायामशाळा असून पहिल्या माळ्यावर महिलांसाठी व्यायामशाळा आहे. येथील व्यायामाचे साहित्य खासगी व्यायामशाळांप्रमाणेच अद्ययावत आहे. 25 लाख रूपये खर्च करून ही व्यायामशाळा अद्ययावत करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. यावेळी शहर प्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक संजय पुनसकर, नगरसेविका शिल्पा सुर्वे, नगरसेवक प्रशांत साळुंखे, अभिजीत गोडबोले उपस्थित होते.

Tags : Konkan, Konkan News, Ratnagiri Nagar Parishad, lead, contemplating, Lokmanya Tilak, Swatantryaveer Savarkar.


  •