Sat, Dec 07, 2019 13:59होमपेज › Konkan › रत्नागिरी न. प. विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध

रत्नागिरी न. प. विषय समिती सदस्यांच्या निवडी बिनविरोध

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:19PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्व विषय समिती सदस्य, सभापती तसेच स्थायी समिती सदस्यपदी शिवसेना नगरसेवकांच्या बिनविरोध निवडी झाल्या. पाणीपुरवठा समिती सभापतिपदी राकेश ऊर्फ बाबा नागवेकर, महिला बालकल्याण सभापतिपदी श्रद्धा हळदणकर, उपसभापतिपदी फरहा पावसकर, आरोग्य समिती सभापतिपदी दिशा साळवी, बांधकाम समिती सभापतिपदी रशिदा गोदड, तर नियोजन समिती सभापतिपदी सुहेल मुकादम यांची निवड झाली. याचबरोबर मानाच्या स्थायी समिती सदस्यपदी पुन्हा प्रदीप साळवी व मधुकर घोसाळे या अनुभवी नगरसेवकांसह भाजपचे राजेश तोडणकर यांना संधी मिळाली.

रत्नागिरी न.प. च्या विषय समिती सदस्य, सभापती, स्थायी समिती सदस्यांची बुधवारी निवडणूक झाली. एकूण 30 पैकी 17 नगरसेवकांचे पूर्ण बहुमत असल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या. विरोधी सदस्यांकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरले नाहीत. केवळ शिवसेना उमेदवारांचे नामनिर्देशित पत्र आले. दुपारी 2 वाजेपर्यंत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व सेना सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले.

मावळते सभापती निमेश नायर व शिल्पा सुर्वे यांना प्रत्येकी 3 समित्यांचे सदस्यत्व, तर राजेश्‍वरी शेट्ये व अस्मिता चवंडे यांना प्रत्येकी 2 समित्यांचे सदस्यत्व मिळाले आहे. उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर या शिक्षण समितीच्या पदसिद्ध सभापती आहेत. या समितीतील नूतन सदस्यांची मात्र निवड करण्यात आली.

पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीची माळ बाबा नागवेकर यांच्या गळ्यात पडली. या समितीत संतोष ऊर्फ बंटी कीर, निमेश नायर, राजेश्‍वरी शेट्ये, अस्मिता चवंडे यांना सदस्यत्व मिळाले. महिला बालकल्याण समिती सभापतिपद श्रद्धा हळदणकर यांच्याकडे आले आहे. त्याचबरोबर फरहा पावसकर उपसभापती बनल्या आहेत. या समितीमध्ये मीरा पिलणकर, अस्मिता चवंडे, वैभवी खेडेकर यांना सदस्यत्व मिळाले आहे. स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतिपदी दिशा साळवी यांची निवड झाली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये निमेश नायर, प्रशांत साळुंखे, शिल्पा सुर्वे, किशोर मोरे यांचा समावेश आहे. बांधकाम समिती सभापतिपदी रशिदा गोदड यांची निवड झाली.