Fri, Jul 19, 2019 01:07होमपेज › Konkan › पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:43PMरत्नागिरी : प्रतिनिधी

कोकण रेल्वेचे 10 जूनपासून पावसाळी वेळापत्रक सुरू होत असून 31 ऑक्टोबरपर्यंत गाड्यांची गती धिमी ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून धोक्याच्या ठिकाणी अलार्म सिस्टीम लावण्यात आली आहे. तसेच रेल्वेमार्गानजीकच्या कटिंग केलेल्या डोंगरांची ‘बूमलिफ्ट’मधून पाहणी करण्यात आली असून आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली.

कोकण रेल्वेचा मार्ग डोंगरदर्‍यातून जात असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर विशेष लक्ष ठेवले जाते. पावसाळी वेळापत्रकात मुंबई ते वीर या मार्गावर रेल्वेची नेहमीची गती (फुल स्पीड), वीर ते कणकवली 75 किमी आणि कणकवली ते मडुरा 90 किमी प्रतितास या वेगाने रेल्वे धावणार आहेत. या मार्गावर 350 ठिकाणी डोंगर कापून रेल्वेलाईन टाकण्यात आली आहे. यातील 320 ठिकाणच्या ड्रेनेज स्वच्छतेचे काम प्रगतीपथावर असून येथे पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणच्या कामांनाही लवकरच प्रारंभ होणार आहे. वादळी वार्‍यामुळे रेल्वे मार्गावर झाडे कोसळू नयेत म्हणून या मार्गावरील धोकादायक झाडांची कटाई करण्यात आली आहे. यामध्ये आकेशिया झाडांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

या मार्गावर दरड कोसळल्यास ती तप्तरतेने हटवण्यासाठी 3 पोकलॅन मशीन सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यांपैकी एक रत्नागिरी, एक चिपळूण आणि एक कणकवलीत आहेत. फ्लॅट वॅगनवर ही मशीन ठेवण्यात आली असून दरड कोसळल्यास तातडीने ती घटनास्थळी रवाना होऊ शकतील. 

याशिवाय रोहा त मदुरा या मार्गावर रात्रीच्यावेळी गस्त घालण्यासाठी 85 पेट्रोलमनची नेमणूक करण्यात आली असून, 65 ट्रॅकमन दिवसभर कार्यरत राहणार आहेत. या मार्गावरील आगवे आणि बोरडवे या ठिकाणी उंच डोंगर असून येथे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अलार्म सिस्टीम लावण्यात आली आहे. या मार्गाची पाहणी ‘बूमलिफ्ट’ या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत 20 मीटर उंचीपर्यंतच्या डोंगरांची पाहणी करण्यात आली आहे. आवश्यक तेथे दुरुस्तीचे उपाय करण्यात आले असून पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत.