Sun, Mar 24, 2019 16:44होमपेज › Konkan › रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्याच अधिपत्याखाली!

रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाच्याच अधिपत्याखाली!

Published On: May 29 2018 1:37AM | Last Updated: May 28 2018 8:50PMमालवण : वार्ताहर

राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दालनात मत्स्य व दुग्धव्यवसाय विकासमंत्री ना. महादेव जानकर तसेच दोन्ही विभागाचे उपसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिकारी, म्हाप्सू विद्यापीठ नागपूरचे कुलगुरू यांचे उपस्थितीत बैठक घेण्यात आली. 

या बैठकीस भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर,  मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर हे उपस्थित होते.  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य विद्याशाखा नागपूर येथे स्थलांतरीत करण्याबाबतची वस्तुस्थिती दोन्ही विभागातील उपसचिव यांनी विषद केली. या विषयाचे गांभीर्य ओळखून  शिक्षणमंत्री  विनोद तावडे यांनी  कोकण कृषी विद्यापीठातील मत्स्य महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नाही, असे सांगितले.

त्याचप्रमाणे कोकणातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी प्रदान केलेल्या पदवीपेक्षा  कोकण कृषी विद्यापीठाने प्रदान केलेल्या पदवीस जास्त महत्त्व असल्याचे नमूद केले. रत्नागिरी मत्स्यविद्यालय नागपूर येथे स्थलांतरित करून कोकणावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. विनोद तावडे  यांच्या आग्रही भूमिकेमुळे  मत्स्य विद्या शाखा कोकण कृषि विद्यापीठाशी संलग्न राहील, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयांस ना. भाऊसाहेब फुंडकर, ना. महादेव जानकर यांनी तत्वत: संमत्ती दिली आहे.

कोकणच्या शैक्षणिक आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील प्रगतीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल तसेच अतुल काळसेकर व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी योग्य पाठपुरावा केल्याबद्दल बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कर्मचारी तसेच मच्छीमार सेल,भाजपा सिंधुदुर्ग यांनी आभार मानले.