Wed, Jul 24, 2019 12:07होमपेज › Konkan › रत्नागिरी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नागिरी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:06PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : क्रीडा प्रतिनिधी

परभणी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग संघांना पराभूत केल्यानंतर अंतिम फेरीतील चुरशीच्या लढतीत बलाढ्य सांगली विभागाला नमवत रत्नागिरी विभागाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. एस.टी.च्या इतिहासात प्रथमच रत्नागिरी विभागाने विजेतेपद पटकावल्याने विजेत्या संघातील खेळाडूंचे विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी अभिनंदन केले आहे.

या स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीचे सामने रायगड पेण येथील सचिन तेंडुलकर मैदानावर झाले. अंतिम फेरीत रत्नागिरीसमोर सांगली संघाचे आव्हान होते. नाणेफेकीचा कौल रत्नागिरीने जिंकत प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांमध्ये सर्व बाद 181 धावा केल्या. राकेश चव्हाणने तीन चौकार व चार षटकारांच्या मदतीने 68 धावा, अमित लांजेकरने 27 धावा केल्या. राकेश चव्हाण व अमित लांजेकर यांच्यात 5 विकेटसाठी 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. स्वप्नील नागलेने 22,  सुबोध बाकाळकरने 16, सूरज खेडेकरने 19,  गुरुप्रसाद मुद्रेने 12 धावांचे योगदान दिले. सांगली संघाकडून प्रमोद कोल्हेने 4, दिनेश मानेने 3,  शीतल कुंभार, दीपक पाटीलने प्रत्येकी 1 गडी बाद केला. 

सांगली विभागाच्या संघाने 182 धावांचा पाठलाग करताना 39.1 षटकांत सर्व बाद 165 धावा केल्या. यात सांगलीचा कर्णधार प्रमोद कोल्हे याने 43, शीतल कुंभार 20, मिलींद  कुंभार, दिनेश माने, दीपक पाटील यांनी प्रत्येकी 14 धावांचे योगदान दिले. 

रत्नागिरी विभाग संघातर्फे सूरज खेडेकर यांनी भेदक मारा करत 4 फलंदाज टिपले. त्याला साथ देताना उत्तम चव्हाण, गुरुप्रसाद मुद्रे, अनिकेत पोतदार, रत्नदीप मुरकर, राकेश चव्हाण यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केले. रत्नागिरी विभाग संघाने हा सामना 16 धावा राखून जिंकला. राकेश चव्हाणला ‘मालिकावीर’ आणि ‘उत्कृष्ट फलंदाज’, सूरज खेडेकरला ‘उत्कृष्ट गोलंदाज’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

यापूर्वी रत्नागिरी विभाग संघाने 1981 व 2010 साली अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण होते. बक्षीस समारंभाच्या वेळी रायगड विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते, मुंबईचे विकास आकलेकर, अहमदनगरचे प्रताप जाधव, बाबा कासम, प्रवीण पाटील, रवी तांडेल, भाई देशपांडे, संजय सुर्वे, रणजीपटू योगेश पवार उपस्थित होते.

या विजयाबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, कामगार कल्याण सुनील मडावी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राजेश मयेकर, सचिव रवी लवेकर, संतोष मळेकर, अनिल चव्हाण यांनी अभिनंदन केले.