Mon, Aug 19, 2019 11:05होमपेज › Konkan › रुग्णालयाचा तांत्रिक कारभारही सुशेगाद

रुग्णालयाचा तांत्रिक कारभारही सुशेगाद

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 9:03PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : योगेश हळदवणेकर

जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्ग 3 ची 53 पदे मंजूर आहेत. यापैकी 29 पदे ही रिक्‍त राहिल्याने 24 जणांच्या खांद्यावर अतिरिक्‍त कामाचा बोजा पडला आहे. त्यामुळे या तांत्रिक पदांबाबतीतही जिल्हा शासकीय रुग्णालयाचा कारभार सुशेगादच आहे. महत्त्वाच्या आणि तातडीच्या वेळी ज्या सेवांची गरज आहे, ती पदे रिक्‍त असल्याने अडचणींचा सामना सहकारी कर्मचार्‍यांना करावा लागत आहे.

रूग्णवाहिका चालक, रक्तपेढी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, दंत यांत्रिक, सीटी स्कॅन विभाग अभिलेखापाल पद, स्वच्छता निरीक्षक, दूरध्वनी चालक, भांडारपाल, नेत्रवाहन चालक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्यांच्या पदांच्या कामाचा भार सहकारी पदांवरील कर्मचार्‍यांच्या खांद्यावर पडत आहे. ही पदे तशी महत्त्वाची असताना ती भरण्याबाबत  शासन स्तरावर उदासीनता आहे. ही उदासीनता झटकण्याची गरज असून शासनाकडे पाठपुरावा करण्यास लोकप्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासन कमी पडत आहे.  

रूग्णवाहिका चालक पदे 2 भरण्यात आलेली असून 2 पदे रिक्‍त राहिल्याने खासगी रूग्णवाहिकांचा व्यवसाय तेजीत होत आहे. मात्र शासनाच्या रूग्णवाहिका असूनही पदे रिक्‍त असल्याने दोन चालकांवर अतिरिक्‍त कामांचा बोजा पडत आहे. रक्‍तपेढी तंत्रज्ञ व क्ष-किरण तंत्रज्ञ ही पदेही तितकीच महत्त्वाची आहेत. तीही रिक्‍त राहिल्याने रूग्णालयाचा कारभार समोर येत आहे. दरम्यान, वर्ग 1 व 2 च्या डॉक्टरांची कमतरता, वर्ग 3 ची पदे रिक्‍त  असल्याने सुमारे 50 टक्के अधिकारी व कर्मचार्‍यांचा कामाचा ताण हा उर्वरित 50 टक्के अधिकारी व कर्मचार्‍यांवर पडत आहे. त्यामुळे हा कारभार सुशेगाद असून याकडे शासन  स्तरावर लक्ष देण्याची गरज आहे.

वर्ग- ‘ड’ ची 30 पदे रिक्‍त 

जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्ग ड ची सरळसेवेने भरलेल्या 133 पदांपैकी 107 पदे कार्यरत असून 26 पदे रिक्‍त आहेत. तर पदोन्नतीने 16 पदांपैकी 12 पदे भरलेली असून 4 पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे एकूण149 पदांपैकी 30 पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे 119 कर्मचार्‍यांवर 30 जणांचा अतिरिक्‍त भार पडत आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.