Fri, Apr 26, 2019 17:18होमपेज › Konkan › मज्जा क्रिकेटप्रेमींची..., सजा मात्र खेळाडूंना!

मज्जा क्रिकेटप्रेमींची..., सजा मात्र खेळाडूंना!

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 8:42PMरत्नागिरी : प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर दि. 12 व 13 मे रोजी बीसीसीआयतर्फे ‘आयपीएल फन पार्क’ उभारण्यात आले होते. यामध्ये मोठ्या एलईडी स्क्रीनवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. याचा आनंद रत्नागिरीतील हजारो क्रिकेटप्रेमींनी लुटला. हे फन पार्क उभारण्यासाठी वापरण्यात आलेली खिळे आणि तारा काम झाल्यावर मैदानातच टाकून देण्यात आल्याने ते गोळा करण्याचे काम खेळाडूंना करावे लागले.  या फन पार्कमध्ये लहान  मुलांसाठीचे फनीगेम्स, लकी ड्रॉ, गेम्स, डीजे साऊंड याचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला. हे फन पार्क उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडी खिळे आणि तारांचा वापर करण्यात आला. सुमारे 10 हजार पे्रक्षक बसू शकतील एवढे कंपाऊंड घालण्यात आले होते. त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणात खिळे आणि तारांचा वापर करण्यात आला. 

दि. 13 रोजी सामना संपल्यावर हे कंपाऊंड काढून टाकताना कंत्राटदाराने मैदानातच लोखंडी खिळे आणि तारा टाकून दिल्या. दुसर्‍या दिवशी येथे सरावासाठी आलेल्या खेळाडूंच्या निदर्शनास हा प्रकार आला. खिळे आणि तारांमुळे एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी हे सर्व खिळे आणि तारा गोळा करून मैदानाबाहेर नेऊन टाकल्या.  या मैदानावर सुविधांची वानवा असून नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रात्रीच्या वेळी येथे मद्यपींचा वावर वाढला आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. मुख्य खेळपट्टीवर वाहने चालवल्याने तिचेही नुकसान झाले आहे.