होमपेज › Konkan › एस.टी.च्या २०७ कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती

एस.टी.च्या २०७ कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती

Published On: Jun 20 2018 10:34PM | Last Updated: Jun 20 2018 10:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

अघोषित संपात सहभागी झाल्यामुळे रोजंदारीवर नव्याने नियुक्त झालेल्या रत्नागिरी विभागातील 207 कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून ही कारवाई करण्यात आली आहे. काही ठिकाणी आगारांमध्ये फेर्‍याही अचानक रद्द  झाल्या. त्यामुळे प्रवाशांनी गोंधळही घातला. 

जाहीर झालेली पगारवाढ अपेक्षेप्रमाणे नसल्याने दि. 8 व 9 जून रोजी एस.टी. कर्मचार्‍यांनी अघोषित संप केला होता. या संपात शिवसेनाप्रणीत कामगार सेनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नव्हते, याव्यतिरिक्त सर्वच कर्मचारी संपात उतरले होते. यामुळे रत्नागिरी विभागाचे 1 कोटी 50 लाखांचे नुकसान झाले होते. या संपात नव्यानेच नियुक्त झालेले रोजंदार कर्मचारीही सहभागी झाले होते. मुळात त्यांची नियुक्ती करताना त्यांना गरजेच्या वेळी कामावर हजर राहावे, अशा सूचना आहेत. मात्र, संप काळात गरज असतानाही ते कामावर गैरहजर राहिले. याची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली असून, त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश रत्नागिरी विभागाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये 158 चालक तथा वाहक, 1 वाहक कनिष्ठ, 46 सहाय्यक कनिष्ठ आणि 2 लिपिक-टंकलेखकाचा समावेश आहे.

एसटीत 1 हजार 700 कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.  यातील पहिल्या बॅचमधील हे उमेदवार आहेत. आता त्यांच्या रिक्त झालेल्या जागी दुसर्‍या बॅचमधील उमेदवारांची निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.