Thu, Jun 27, 2019 03:35होमपेज › Konkan › रेशन वाहतुकीत ट्रक मालकांना भुर्दंड

रेशन वाहतुकीत ट्रक मालकांना भुर्दंड

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 9:53PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

रेशन धान्य वाहतुकीचा मुद्दा गुंतागुंतीचा होऊ लागला आहे. ज्या ठेकेदाराला धान्य वाहतुकीचा ठेका मिळाला आहे, त्या ठेकेदाराने धान्य वाहतुकीसाठी कमी भाडे देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे स्थानिक ट्रक मालकांना ट्रक भाड्यात एक ते दीड हजार रुपयांचा तोटा होणार आहे. इतका मोठा आर्थिक भुर्दंड परवडणे शक्य नाही. जुन्याच दराने स्थानिक वाहतुकदारांना भाडे मिळाले पाहिजे. ठेकेदार कंपनीने इतर ठिकाणाहून ट्रक आणून रेशन धान्य वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रत्नागिरी जिल्हा मोटर मालक असोसिएशन आणि रत्नसिंधू मोटरमालक-चालक संघाने पत्रकार परिषदेत दिला.

रेशन धान्य वाहतुकीचा ठेका मुंबईतील एका कंपनीला मिळाला आहे. हा ठेका मिळविण्यासाठी ठेकेदाराने जिल्हा मोटर मालक असोसिएशनच्या साळवी स्टॉप येथील कार्यालयातून वाहतूक भाड्याचे दरपत्रक मिळविले. त्यानंतर कमी दरात निविदा भरून ठेका मिळविला. त्यानंतर स्थानिक ट्रक वाहतुकदारांत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. जानेवारीत हा ठेका मिळाल्यानंतर ठेकेदाराने परस्पर वाहतूक केली तर ती वाहने रोखली जातील, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ही वाहतूक रत्नागिरी-सिंधुदुर्गतील ट्रकधारकांना देण्यासाठी ठेकेदार तयारी दाखविताना भाड्याचा दर मात्र कमी ठेवत आहे.

धान्य वाहतूक ठेका मिळालेल्या कंपनीने एक ते दीड हजार रुपयांची तफावत होईल, इतका कमी दर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या पार्श्‍वभूमीवर मोटर मालक असोसिएशनच्या साळवी स्टॉप येथील कार्यालयात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतील ट्रक मालकांची बैठक झाली. या बैठकीत इतक्या कमी दरात धान्य वाहतूक न करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदाराने स्थानिक ट्रक न मिळाल्यास इतर ठिकाणाहून आणि स्वत:चे ट्रक वापरण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्‍वभूमीवर ठेकेदाराची चतुराई दाखवून देण्यासाठी आणि जुन्या पद्धतीनेच दर मिळावा, यासाठी दोन्ही संघटना मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत. त्याचवेळी ठेकेदार कंपनीने आपला हेका कायम ठेवून धान्य वाहतूक करण्याचा प्रयत्न केला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बैठकीनंतर असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश उर्फ विकास सावंत, उपाध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

स्थानिक वाहतुकदारांना मिळणारा भाड्याचा दर हा तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव, आरटीओ आणि पुरवठा अधिकारी यांनी एकत्रितपणे ठरविला होता. याच दरावर वाहतुकदार 24 तास वाहतूक करण्यास तयार आहेत. ठेकेदार कंपनीने स्वत:च्या गाड्या आणून धान्य वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास उद्भवणार्‍या परिस्थितीला संबंधीत ठेकेदार कंपनी जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रत्नसिंधुचे संकेत चवंडे, श्रीनिवास वरवडेकर यांच्यासह स्थानिक ट्रकमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.