होमपेज › Konkan › शिधापत्रिकाधारकांना आता रोख सबसिडीचा पर्याय

शिधापत्रिकाधारकांना आता रोख सबसिडीचा पर्याय

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:28PMरत्नागिरी : प्रतिनिधी    

रेशन धान्य दुकानांमार्फत मिळणार्‍या स्वस्त धान्याऐवजी रोख पैशाच्या स्वरुपात सबसिडी देण्याचा पर्याय रेशनकार्डधारकांना उपलब्ध करुन देण्याचा निर्णय अन्‍न व नागरी  पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशान्वये घेतला आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्यात याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार असून, प्रायोगिक तत्वावर मुंबईमधून याला प्रारंभ करण्यात येणार आहे.

स्वस्त धान्य दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारकांना वितरित होणार्‍या धान्याऐवजी रोख अनुदान देण्याचा पर्यायाबाबत सरकार काही वर्षापासून विचार करीत होते. परंतु, या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत होत्या. आता संपूर्ण देशात रेशनकार्ड आधारकार्डशी जोडण्यात आल्यामुळे रेशनकार्डधारकांना धान्याऐवजी रोख स्वरुपात अनुदान थेट लाभाधारकांच्या खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ही योजना राबवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला  आहे.

केंद्र व राज्य सरकारची ही योजना असल्याने केंद्राने राज्य सरकारला अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मात्र प्राथमिक टप्प्यात या योजनेला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद, त्याच्या अंमलबजावणीत येणार्‍या अडचणी, याचा अभ्यास करुनच राज्य शासन टप्प्याटप्प्याने ही योजना राबविणार आहे.

स्वस्त दर धान्य दुकानदारांमार्फत रेशनकार्डधारांना अन्‍नधान्य, साखर, रॉकेल, डाळ आदी उपलब्ध करुन देत असते. त्याचा फायदा थेट लाभधारकांना मिळतो की नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई-पॉस मशिनचा वापर केला जाणार आहे.

याबाबतचे आदेश अन्‍न, नागरी  पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांनी जारी केला  आहे.

...तर रोख सबसिडी थेट खात्यात जमा होणार

रेशनकार्डधारकांना धान्य अथवा रोख सबसिडी असा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध करुन देण्यासाठी कार्डधारकांनी आपली पसंती दिल्यानंतरच त्याचा थेट लाभ दिला जाणार आहे. ज्यांनी रोख अनुदानाचा प्रस्ताव दिला असेल त्याचे अनुदान महिला कुटुंब प्रमुखांच्या नावावर असलेल्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना धान्य किंवा रोख अनुदान असे दोन्ही पर्याय उपलब्ध रहाणार आहे.