होमपेज › Konkan › रेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले

रेशन काळाबाजार करणार्‍या सातजणांना रंगेहाथ पकडले

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 10:23PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

सरकारमान्य रेशन दुकानांसाठी वितरित केलेल्या तांदूळ आणि रॉकेलचा साठा काळ्या बाजारासाठी लंपास करणार्‍यांवर पुरवठा अधिकारी दीपक कुळये यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील रेशन दुकानावरील माल शुक्रवारी मध्यरात्री नेला जात असताना धाड  टाकून ही कारवाई करण्यात आली. सातजणांना अटक करण्यात आली असून रेशन दुकानमालक पळून गेला आहे. तांदूळ आणि रॉकेल नेण्यासाठी आणलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.

चाफे येथील संजय सागवेकर यांच्या रास्त धान्य दुकानातील माल मध्यरात्री बाहेर काढला जाणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी दीपक कुळये यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने पाळत ठेवली. टाटा कंपनीची एक गाडी (एमएच-08/डब्ल्यू-4899) त्या दुकानाजवळ थांबली होती आणि माल हलवण्याच्या बेतात असतानाच छापा मारण्यात आला. पकडलेल्या व्यक्तींसह वाहन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पानवळ येथे राहणार्‍या सुरेश लक्ष्मण घवाळी, गणपत गोपाळ घवाळी, रामचंद्र जानू घवाळी, सुधाकर सोना घवाळी, कृष्णा घवाळी, रामचंद्र शंकर घवाळी आणि धामणसे येथील लोकेश सुधाकांत जाधव यांना अटक करण्यात आली. दुकानमालक संजय सागवेकर यांचा शोध घेतला जात आहे. जयगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कांबळे याप्रकरणी तपास करीत आहेत.

छाप्यात पकडलेल्या गाडीत प्रत्येकी 50 किलो वजनाची तांदळाची 20 पोती  आढळून आली आहेत. त्याची किंमत 20 हजार रुपये असून 250 लिटर रॉकेलही सापडले आहे. सात कॅनमध्ये प्रत्येकी 35 लिटर रॉकेल भरून घेण्यात आले होते. जीवनावश्यक कायदा कलम 3 व 7 अन्वये जयगड पोलिसांनी कारवाई केली आहे.