Tue, Nov 13, 2018 10:09



होमपेज › Konkan › दरवाढीने सामान्यांची एसटी झाली ‘लक्झरी’

दरवाढीने सामान्यांची एसटी झाली ‘लक्झरी’

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 18 2018 9:03PM



रत्नागिरी : प्रतिनिधी

डिझेल दरवाढ, कामगार वेतनाचा मुद्दा पुढे करून एस.टी. महामंडळाने 18 टक्के दरवाढ केली. रेल्वे, खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ही सर्वाधिक दरवाढ आहे. लक्झरी गाड्यांच्या बरोबरीने एस. टी. चे दर गेल्याने एस. टी. आता गरिबांची राहिली नाही. दरवाढीमुळे प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता प्रवासी संख्येत घट होण्याची भीती आहे. तर आधीच तोट्यात असलेल्या एस.टी.ला पुन्हा तोट्याच्या गर्तेत ढकलण्याची योजना सरकारनेच आखली असल्याची टीका केली जात आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या  ब्रीदवाक्यानुसार एस.टी. धावू लागली. एस.टी. मुळे अनेक गावे  जोडली गेली, त्यांच्या विकासाला गती लाभली. मात्र, कालांतराने खासगी वाहतुकीने एस.टी. ला आव्हान निर्माण केले. एस.टी. ला दरवर्षी कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागतो. आता डिझेल दरवाढ, कामगार वेतनवाढीमुळे एस.टी. ने 16 जूनपासून 18 टक्के दरवाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. साहजिकच  प्रवाशांचा ओढा  खासगी वाहतूक व रेल्वे प्रवासाकडे वळत आहे. 

कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर भरमसाठ आहे. अन्य राज्यांत टप्प्याला 80 पैसे किलोमीटर पडतो, तर तोच दर महाराष्ट्रात 1.21 पैसे आहे. एस. टी. ची किती दरवाढ करावी, यासाठी समिती नेमली होती. या समितीने कमीतकमी 10 टक्के दरवाढीची शिफारस केली होती. परंतु, सरकारने सरसकट 18 टक्के दरवाढ करून प्रवाशांना झटका दिला आहे. साहजिकच भविष्यात खासगी प्रवासाकडे प्रवासी वळणार आहेत. 

गेल्या चार वर्षांत डिझेलचे दर ज्यावेळी वाढतील त्यावेळी एस. टी. दरवाढ होत आली आहे. 2014 मध्ये जुलै व ऑगस्ट या  महिन्यांत दोनवेळ दरवाढ झाली.  तुुलनेत रेल्वेची दरवाढ मात्र झालेली नाही. अतिशय कमी दरात रेल्वेचा सुरक्षित प्रवास सुरू आहे. प्रवासी आता रेल्वेने जाणे पसंत करीत आहेत.

प्रवासी संघटना नावापुरत्या?

डिझेल दरवाढ व कर्मचारी वेतनवाढीमुळे  एस.टी.ची भाडेवाढ केल्याचे सरकार सांगते. या वाढीची वसुली तिकीट दरवाढीतून प्रवाशांच्या खिशातून केली जात आहे. रेल्वेपेक्षा पाचपट दरवाढ एस.टी. ने केली आहे. प्रवाशांच्या अडचणी, त्यांच्या हक्कासाठी लढण्याकरिता प्रवासी संघटना आहे. परंतु, ही संघटना नावालाच असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात आली.भरमसाठ भाडेवाढ होताना संघटना काय करते? असा सवला उपस्थित होत आहे.