Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Konkan › रानपाट गाव सुरेख... विकासात प्रगत!

रानपाट गाव सुरेख... विकासात प्रगत!

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 10:49PMरत्नागिरी : विशाल मोरे

तालुक्यातील एका टोकाला असलेले रानपाट गावाचे क्षेत्र तसे लहानच. लोकसंख्याही अन्य गावाच्या तुलनेत कमी. पण, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवून विकासाकडे वाटचाल करण्यात हे गाव यशस्वी ठरले आहे. अर्थातच या यशामागे ग्रामपंचायत आणि गावच्या विकासासाठी झटणार्‍या अनेकांचे हात आहेत.

निवळी-गणपतीपुळे मार्गावरून तीन किमी अंतर असलेल्या या गावचे एकूण क्षेत्र 262  हेक्टर एवढे आहे. गावची लोकसंख्या 670 आहे. 114 घरांतील 160 कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावात प्रवेश करताच प्रकर्षाने उल्‍लेख करावा लागतो तो येथील स्वच्छतेचा. मुख्य रस्ते तर चकाचक पण अंतर्गत रस्त्यांवरही तेवढीच स्वच्छता. गावातील स्वच्छतेची दखल पंचायत समितीनेही घेऊन सन् 2017-18 मध्ये ग्रामपंचायतीला सन्मानपत्र दिले आहे.

गाव हंडामुक्‍त करण्याचा विडा ग्रामपंचायतीने उचलला होता. गावातील कोणत्याही महिलेच्या डोक्यावर पाणी आणण्यासाठी हंडा नको, यासाठी ग्रामपंचायतीकडून घरोघरी नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. यासाठी दोन पाणी  साठवण टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. या दोन टाक्यांमध्ये  40 हजार लिटरहून अधिक पाणी साठवले जाते. गेल्या अनेक वर्षांत एकही दिवस पाणीपुरवठ्यात व्यत्यय आलेला नाही हे विशेष म्हणावे लागेल.

निर्मलग्राम योजनेची अंमलबजावणी करताना घरोघरी शौचालये बांधण्यात आली आहेत. यासाठी शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचे प्रत्येक लाभार्थ्याला वाटप करण्यात आले आहे. सन् 2007 साली राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे. सरपंच स्मिता गोनबरे, उपसरपंच बाळकृष्ण गोनबरे आणि सर्व सदस्य गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत.

शासनाने सुरू केलेल्या तंटामुक्‍त मोहिमेत सहभाग घेत पहिल्याच वर्षी म्हणजेच 2009 साली 1 लाखाचा पुरस्कार पटकावला. गेल्या 9 वर्षांत गावाने तंटामुक्‍त गाव म्हणून सातत्य राखले आहे. यात पोलिस पाटील सुनील गोनबरे मोलाची भूमिका बजावत आहेत.गावात सातवीपर्यंत शाळा असून या शाळेत 84 विद्यार्थी धडे गिरवत आहेत. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये शाळेने डिजिटल क्‍लासरुम सुरू केली आहे. यासाठी येथील ग्रामस्थ व चिपळुणातील डीबीजे कॉलेजमध्ये प्राध्यापक असणारे संतोष गोनबरे यांनी विशेष मेहनत घेतली.

रानपाटचा धबधबा असूनही ओळख उक्षीची

रानपाट गावात बारमाही वाहणारा धबधबा आहे. कोकण रेल्वेतून जाताना दिसणारा हा धबधबा पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेतो. हा धबधबा पाहण्यासाठी परजिल्ह्यातूनही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मुंबई-गोवा महामार्गावरील उक्षी गावातून या धबधब्याकडे जाण्याचा मार्ग असल्यामुळे याची ओळख उक्षीचा धबधबा अशी झाली. मात्र, हा धबधबा रानपाट गावात असून, शासन  दफ्तरी याची नोंद आहे. शासनामार्फत या धबधब्यासंबधित पत्रव्यवहार रानपाट ग्रामपंचायतीकडे केला जातो. त्यामुळे हा धबधबा रानपाट-उक्षी असा संबोधला जावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.